

बंगळूर; वृत्तसंस्था : जलद गोलंदाज अरुंधती रेड्डी गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने अवघ्या आठवडाभराच्या उंबरठ्यावर आलेल्या ‘आयसीसी’ महिला विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अरुंधतीला इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर काही काळ चालल्यानंतर पुढे व्हीलचेअरवरून मैदानाबाहेर जावे लागले. गोलंदाजी करताना फॉलो-थ्रू मध्ये तिला दुखापत झाली. यामुळे विश्वचषकातील तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेड्डीने इंग्लंडची सलामीवीर एमी जोन्सला बाद केले. त्यानंतर हेदर नाईटने तिच्या दिशेने फटका लगावल्यानंतर ती झेल घेण्याच्या प्रयत्नात होती. यादरम्यान, ती विचित्र पद्धतीने मैदानावर कोसळली. डॉक्टरांनी तत्काळ मैदानात धाव घेत तिच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, यानंतरही तिला मैदानाबाहेर जावे लागले.
गेल्या वर्षी पदार्पण करणार्या अरुंधतीने 11 वन-डे सामन्यांमध्ये 32.66 च्या सरासरीने 15 बळी घेतले आहेत. यात 26 धावांत 4 बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्वात अलीकडील द्विपक्षीय मालिकेत तिने दोन सामन्यांत चार बळी घेतले होते. यात दिल्लीतील सामन्यात घेतलेल्या तीन विकेटस्चा समावेश होता. या वर्षात तिने 6 सामन्यांमध्ये 41.85 च्या सरासरीने सात बळी घेतले आहेत.