ठळक मुद्दे :
द. आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना १९ ऑगस्ट रोजी रंगणार.
ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त
कांगारू संघात दोन नवीन खेळाडूंचा संघात समावेश
australia vs south africa odi series
ऑस्ट्रेलियाने फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू ॲरॉन हार्डी यांचा आगामी वनडे मालिकेसाठी संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ ऑगस्टपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होत आहे.
केर्न्स येथे सुरू होणाऱ्या या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मॅट शॉर्ट, मिच ओवेन आणि लान्स मॉरिस या खेळाडूंचा समावेश नसेल. हे तिन्ही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेतून बाहेर पडले आहेत. शॉर्टला साईड स्ट्रेनचा (Side Strain) त्रास आहे. ओवेन कनकशनच्या (Concussion) समस्येशी झुंज देत आहे. तर मॉरिस पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे.
मॅट शॉर्टला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान सराव करताना दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्याचबरोबर, मॉरिसच्या पाठीला सूज आहे. त्याला पुढील तपासणीसाठी पर्थ येथे पाठवण्यात आले आहे.
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ओवेनच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यामुळे कनकशनमुळे तो अखेरच्या टी-२० सामन्यातून आणि आगामी वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या १२ दिवसीय कनकशन प्रोटोकॉलच्या नियमांमुळे ओवेनला संघातून बाहेर बसावे लागले आहे. बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेले कुहनेमन आणि हार्डी हे दोन्ही खेळाडू क्वीन्सलँड संघाचे प्रतिनिधित्व करतात.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवारी खेळवला जाईल.