AUS vs WI 1st T20 Mitchell Owen debut half fifty against West Indies
किंग्स्टन : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. सबिना पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान वेस्ट इंडिजवर 3 गडी राखून मात केली. या विजयाचा शिल्पकार ठरला ते पदार्पण करणारा मिचेल ओवेन. त्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी खेळून सर्वांची मने जिंकली.
याआधी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान वेस्ट इंडिजला 3-0 असा क्लिन स्वीप दिल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेतही विजयी सलामी दिली आहे. किंग्स्टन येथील सबिना पार्कवर झालेल्या पहिल्या सामन्यात, नवोदित मिचेल ओवेनच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. ओवेनने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावण्याची किमया केली. या कामगिरीमुळे त्याने रिकी पाँटिंग आणि डेव्हिड वॉर्नर यांसारख्या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
खरे तर, आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणात अर्धशतक झळकावणारा मिचेल ओवेन हा केवळ तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी केवळ रिकी पाँटिंग आणि डेव्हिड वॉर्नर यांनीच ही मोठी कामगिरी केली होती. इतकेच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाकडून टी-20 पदार्पणात तिसरी सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रमही ओवेनच्या नावावर नोंदवला गेला आहे. 23 वर्षीय मिचेल ओवेनने अवघ्या 27 चेंडूंत 6 गगनचुंबी षटकारांसह 50 धावांची खेळी साकारली. त्याला कॅमेरून ग्रीनची उत्कृष्ट साथ लाभली. ग्रीननेही 26 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 51 धावांची वेगवान खेळी साकारली.
रिकी पाँटिंग : 98* (55 चेंडू) विरुद्ध न्यूझीलंड, 2005
डेव्हिड वॉर्नर : 89 (43 चेंडू) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2009
मिचेल ओवेन : 50 (27 चेंडू) विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025
ग्रीन आणि ओवेनच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ 190 धावांच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचला. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव काहीसा गडगडला होता, परंतु अखेरीस बेन ड्वार्शुइस आणि सीन ॲबॉट यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने एक षटक बाकी असतानाच वेस्ट इंडिजवर 3 गडी राखून विजय मिळवला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजच्या संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 189 धावा उभारल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेस (60) आणि सलामीवीर शाई होप (55) यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियासाठी बेन ड्वार्शुइसने 4 षटकांत 36 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी झालेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. आता मालिकेतील दुसरा टी-20 सामना 22 जुलै रोजी सबिना पार्क येथेच खेळवला जाईल.