aus vs sa 3rd odi travis head mitchell marsh cameron green hit century
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने रविवारी (दि. २४) द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘क्लीन स्वीप’चे संकट टाळण्यासाठी धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन यांच्या शानदार शतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तब्बल १० वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक धावांची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत केवळ २ गडी गमावून ४३१ धावा केल्या. ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ९वी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी सलामीच्या गड्यासाठी ३४.१ षटकांत २५० धावांची विक्रमी भागीदारी रचली. हेडने १०३ चेंडूंत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १४२ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर, मिचेल मार्शने १०६ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. तो १०० धावांवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३६.३ षटकांत २ बाद २६७ अशी होती.
यानंतर आलेल्या कॅमेरॉन ग्रीनने केवळ ५५ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ११८ धावांची स्फोटक खेळी केली. तर, यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने ३७ चेंडूंत नाबाद ५० धावांचे योगदान दिले. ग्रीन आणि कॅरी यांच्यात तिसऱ्या गड्यासाठी १६७ धावांची अभेद्य भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यांनी द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्यांदा हा पराक्रम केला आहे, तर यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धही अशीच कामगिरी केली होती. वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ४ गडी गमावून ४९८ धावा केल्या होत्या. भारताची सर्वोच्च धावसंख्या ७ बाद ४१४ असून, २००९ मध्ये राजकोट येथे श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम नोंदवला गेला होता.