स्पोर्ट्स

IND vs AUS Test : अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला ‘अ’ संघाचा भारत ‘अ’ संघावर विजय

कांगारूंनी केला 281 धावांचा यशस्वी पाठलाग, युवा फलंदाजांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे बाजी

रणजित गायकवाड

AUS-A vs IND-A Unofficial Test australia women a team defeat india women a team

ब्रिस्बेन : युवा फलंदाजांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघावर सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. ब्रिस्बेन येथील लन बॉर्डर फील्डवर झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या अंतिम दिवशी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 281 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य यशस्वीपणे पार केले.

चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच तासात अ‍ॅमी एडगरने डावात पाच बळी घेण्याची किमया साधत भारत ‘अ’ संघाचा डाव 286 धावांवर रोखला. त्यानंतर, अनिका लिरॉयड (72), मॅडी डार्क (68) आणि रॅशेल ट्रेनामन (64) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अंतिम सत्रात विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्याचे पहिले तीन दिवस अत्यंत अटीतटीचे झाले होते आणि दोन्ही संघांनी विविध सत्रांमध्ये आपले वर्चस्व गाजवले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या सलामीवीर ट्रेनामन आणि कर्णधार ताहलिया विल्सन (46) यांनी कमालीचा संयम आणि द़ृढनिश्चय दाखवला.

या जोडीने पहिल्या गड्यासाठी 117 धावांची भक्कम भागीदारी रचली. कर्णधार विल्सन सायमा ठाकोरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यावर ही जोडी फुटली. धावसंख्येत केवळ एका धावेची भर पडताच ट्रेनामनही तंबूत परतली.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ लक्ष्यापासून 163 धावा दूर असताना भारत ‘अ’ संघाला सामन्यात पुनरागमनाची संधी दिसू लागली होती. परंतु, लिरॉयड आणि डार्क यांनी भारतीय संघाच्या आशांवर पाणी फेरले. विजय द़ृष्टिपथात असताना दोघीही बाद झाल्या, पण निकोल फाल्टमने (16 नाबाद) शेवटच्या क्षणी कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करत ऑस्ट्रेलियन संघाला विजयापर्यंत पोहोचवले.

  • भारत ‘अ’ महिला पहिला डाव : 299.

  • ऑस्ट्रेलिया ‘अ’ पहिला डाव : 305.

  • भारत ‘अ’ महिला दुसरा डाव : 286.

  • ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला दुसरा डाव (टार्गेट 281) : 85.3 षटकांत 4 बाद 283. (मॅडी 68, अनिका लिरॉईड 72).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT