Asian Para Games 2026 Sheetal Devi Record : आशियाई पॅरा गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताच्या १६८ सदस्यीय पथकाने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय तिरंदाज आणि बॅडमिंटनपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. नेमबाजांनी दोन अंतिम फेऱ्यांसाठी पात्रता मिळवली आहे. २०२२ आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने १११ पदकांवर आपली मोहोर उमटवली होती.
भारतीय पॅरा-तिरंदाज शीतल देवीने महिलांच्या कंपाउंड पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत ७२० पैकी ७०४ गुण मिळवले. याद्वारे तिने जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आणि नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. तिने ६९८ गुणांचा जुना आशियाई विक्रम सहा गुणांच्या फरकाने मागे टाकला.
आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या J2 -५२ किलो वजनी गटातील ज्युडो स्पर्धेत भारताच्या कोकिलाने चीनच्या यी लिऊचा १-० असा पराभव करून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. हांगझू गेम्समध्ये -४८ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणारी ही भारतीय ज्युडोपटू आता सुवर्णपदकासाठी किर्गिस्तानच्या आयबिके उलानबेक किझीशी भिडणार आहे. पुरुषांच्या गटात निराशाजनक निकाल पाहायला मिळाला; J1 -७० किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कपिल परमारला इंडोनेशियाच्या जुनाएदीकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. आता कपिलकडे कांस्यपदकासाठीच्या लढतीत इंडोनेशियाच्या अनाफ राफली शिदकीविरुद्ध पुन्हा एकदा पदक जिंकण्याची संधी असेल.
भारताच्या स्वाती चौधरीने महिलांच्या W1 तिरंदाजी प्रकारात अव्वल स्थान (टॉप सीड) पटकावले आहे. तिने रँकिंग फेरीत ६४८ गुणांची कमाई करत आशियाई पॅरा गेम्सचा नवा विक्रम नोंदवला. सहा स्पर्धकांच्या गटात ती पहिल्या क्रमांकावर राहिली, ज्यामुळे तिला एलिमिनेशन फेऱ्यांमध्ये सर्वोत्तम स्थान मिळाले आहे. आता स्वाती या फॉर्मला नॉकआउट फेऱ्यांमध्येही कायम राखण्याचा प्रयत्न करणार असून, पात्रता फेरीतील या विक्रमी कामगिरीचे रूपांतर पदकात होणार का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.