आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक पटकावणारे भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांनी जीवन संपवल्‍याची घटना आज उघडकीस आली.  File Photo
स्पोर्ट्स

Neeraj Yadav Death : धक्कादायक...! तीन वेळा आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदक विजेत्या नीरज यादव यांनी जीवन संपवले

मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट नाही, क्रीडा जगतावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Neeraj Yadav pass away : आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक पटकावणारे भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांनी जीवन संपवल्याची घटना आज (दि. २८ ऑक्टोबर) उघडकीस आली. या घटनेमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. ४२ वर्षीय नीरज यादव हे 'एफ५५' (F55) श्रेणीत सहभागी होत असत. त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृत्यू मागील कारण अद्याप स्पष्ट नाही

भारताचे मुख्य पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "नीरज यादव यांनी जीवन संपवल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या फ्लॅटमध्ये विष प्राशन केले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आणि शोकांतिका आहे." दरम्यान, पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि त्यांचे सहकारी पॅरा-ॲथलीट विपिन कसाना रुग्णालयात उपस्थित होते. यादव यांच्या मृत्यूमागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

... तेव्हापासून होते मानसिक तणावाखाली

प्रशिक्षक एस. सत्यनारायण म्हणाले की, "डोपिंगच्या आरोपाखाली निलंबन झाल्यामुळे नीरज यादव हे 'आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्स'मध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. यामुळे मागील काही दिवस ते मानसिक तणावाखाली असावेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते खूप उत्सुक होते. कदाचित याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला असावा, पण ते नेमक्या कोणत्या मानसिक स्थितीतून जात होते, हे निश्चितपणे सांगता येणार नाही."

भारतातील अत्यंत यशस्वी पॅरा-ॲथलीट्सपैकी एक

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले नीरज यादव हे भारतातील अत्यंत यशस्वी पॅरा-ॲथलीट्सपैकी एक होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना 'पोस्ट-पोलिओ रेसिज्युअल पॅरालिसिस' (पोलिओनंतरचा अर्धांगवायू) झाल्याचे निदान झाले होते. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी आपल्या क्रीडा महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा सुरू ठेवला. २००५ ते २०१२ या काळात त्यांनी व्हीलचेअर टेनिस खेळले आणि त्यानंतर ते पॅरा-ॲथलेटिक्सकडे वळले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

२०१५ च्या दिल्ली राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांना मोठी ओळख मिळाली, जिथे त्यांनी शॉट पुट (गोळाफेक), जेव्हलिन (भालाफेक) आणि डिस्कस थ्रो (चक्रफेक) या प्रकारांत सुवर्णपदके जिंकली होती. यादव यांनी जकार्ता येथे झालेल्या २०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या F55 भालाफेकीत २९.८४ मीटरचा आशियाई विक्रम नोंदवून सुवर्णपदक जिंकले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये हांगझू आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक आणि थाळीफेक या दोन्ही स्पर्धा जिंकून दोन सुवर्णपदके पटकावली. आपल्या कारकिर्दीतील आशियाई पॅरा गेम्समधील तीन सुवर्णपदके त्यांच्या नावावर होती.

डोपिंगच्या आरोपांमुळे कारकीर्द झाकोळली

नीरज यादव यांची कारकीर्द एका उत्तेजक-विरोधी प्रकरणामुळे झाकोळली गेली. ऑक्टोबर २०२३ मध्ये बंगळूरु येथे स्पर्धेबाहेर घेतलेल्या त्यांच्या नमुन्यात स्टॅनोजोलॉल या ॲनाबॉलिक स्टिरॉइडची उपस्थिती आढळल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक-विरोधी संस्थेने त्यांना तात्पुरते निलंबित केले. यानंतर त्यांनी उत्तेजक-विरोधी शिस्तपालन प्रक्रियेद्वारे आपल्या नमुन्याच्या डीएनए चाचणीची मागणी केली होती. मात्र आता शारीरिक आव्हानांवर मात करत आपली कारकीर्द घडविणाऱ्या उमेददार खेळाडूने जीवन संपवल्याने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT