स्पोर्ट्स

Asian Games 2026 : सर्वेश कुशारेने रचला इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत ५६ वर्षांची प्रतीक्षा संपवत उंच उडीत पटकावले रौप्यपदक

यापूर्वी १९७० च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत भीम सिंग यांनी भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते.

रणजित गायकवाड

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील रविवारचा दिवस भारतीय ॲथलेटिक्ससाठी ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडी (हाय जंप) प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताची या क्रीडा प्रकारातील तब्बल ५६ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. यापूर्वी १९७० च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत भीम सिंग यांनी भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते.

महाराष्ट्रातील देवर्गावचा सुपुत्र असलेल्या ३१ वर्षीय सर्वेशचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेच वैयक्तिक पदक आहे. २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले होते. अंतिम फेरीत बहुतांश वेळ सर्वेशने अग्रस्थान राखत सुवर्णपदकावर भक्कम दावा ठोकला होता. मात्र, चिनी तैपेईच्या फू चाओ-ह्सुआनने पहिल्याच प्रयत्नात २.२५ मीटरची उंची यशस्वीरीत्या पार करून आघाडी घेतली. सर्वेशला पहिल्या प्रयत्नात ही उंची गाठता आली नाही, तरीही त्याने जिद्द न सोडता दुसऱ्या प्रयत्नात २.२५ मीटरची यशस्वी उडी नोंदवली. अखेर अत्यल्प फरकाने सुवर्णपदक हुकल्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अँसी सोजनला महिला लांब उडीत रौप्यपदक

महिलांच्या लांब उडीत भारताच्या अँसी सोजननेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अँसी ६.५३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह अग्रस्थानी होती. मात्र, चीनच्या हुआंग यिंगयिंगने अंतिम फेरीत ६.५५ मीटरची उडी घेत सुवर्णपदक खेचून आणले.

याच स्पर्धेत भारताची शैली सिंग पदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती. बऱ्याच वेळेपर्यंत तिसऱ्या स्थानावर असलेल्या शैलीला अंतिम फेरीत चीनच्या तान मेंगयीने (६.४६ मीटर) मागे टाकले. अखेर शैली ६.४२ मीटरच्या प्रयत्नासह चौथ्या स्थानावर राहिली. त्यामुळे या प्रकारात चीनने सुवर्ण आणि कांस्य या दोन्ही पदकांवर कब्जा केला.

हरिता भद्राला २०० मीटर धावण्यात कांस्यपदक

महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हरिता भद्राने २३.२० सेकंदांची वेळ नोंदवत रोमहर्षक लढतीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. तिने जपानच्या इदो अबिगेइरुफुकाला (२३.२१ सेकंद) अवघ्या एका मायक्रोसेकंदाच्या फरकाने मागे टाकले.

या शर्यतीत सिंगापूरच्या शांती परेराने मोसमातील सर्वोत्तम २२.७८ सेकंदांची नोंद करत सुवर्ण, तर चीनच्या चेन युजीने २२.९३ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. भारताची दुसरी धावपटू उन्नती अयप्पा बोलँड २३.४८ सेकंदांच्या वेळेसह सहाव्या क्रमांकावर राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT