स्पोर्ट्स

Asian Games 2026 : भारतीय कबड्डी संघ दोन्‍ही गटांत उपांत्‍य फेरीत

पुरुष गटात चायनीज तैपेईचा, तर महिला गटात जपानचा धुव्‍वा

रणजित गायकवाड

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारताने अपराजित घोडदौड कायम राखत कबड्डीच्या पुरुष व महिला या दोन्ही गटांत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. साखळी फेरीत दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी नोंदवत प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवले. गुरुवारी पार पडलेल्या ‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यांमध्ये भारताने चायनीज तैपेई आणि जपानचा धुव्वा उडवला. भारतीय पुरुष संघाने चायनीज तैपेईचा ३७-२१ असा पराभव केला, तर भारतीय महिला संघाने यजमान जपानवर ५०-२५ अशी मात करत गटात अव्वल स्थान पटकावले.

साखळी फेरीत भारताची अपराजित कामगिरी

पुरुष संघाने साखळी फेरीतील सलग चौथा विजय नोंदवत उपांत्य फेरीसह किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. याआधी भारताने दक्षिण कोरिया, जपान आणि बांगला देशचा पराभव केला होता. चायनीज तैपेईविरुद्ध भारताने सुरुवातीपासूनच नियंत्रण राखत मध्यंतरापर्यंत २३-११ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातही १४-१० अशी आघाडी राखत भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. १९९० मध्ये कबड्डीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झाल्यापासून भारतीय पुरुष संघाने आठ सुवर्णांसह एकूण नऊ पदके जिंकून या खेळावर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. केवळ २०१८ च्या स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

महिला संघाचीही अपराजित मालिका कायम

दुसरीकडे, महिला संघानेही साखळी फेरीत अपराजित राहण्याची परंपरा कायम ठेवली. सुरुवातीच्या सामन्यात बांगला देशचा पराभव केल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात इराणवर ३७-२३ अशी मात केली होती. जपानविरुद्धचा सामना भारतासाठी एकतर्फी ठरला. पहिल्या सत्रात ३२-१३ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी दुसऱ्या सत्रात आणखी १८ गुणांची भर घातली. महिला संघाने ३७ आऊट गुण, सात बोनस गुण आणि लोणचे सहा गुण नोंदवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT