स्पोर्ट्स

Asia Cup Trophy Row : आशिया चषक ‘ACC’ कार्यालयात ‘कैद’! मोहसीन नक्वींच्या परवानगीशिवाय हलवायला बंदी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : दुबईत झालेल्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवून भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. परंतु, एशियन क्रिकेट काऊंसिलचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास संघाने नकार दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर, ट्रॉफी सध्या ‘एसीसी’च्या दुबई येथील मुख्यालयात बंद करून ठेवण्यात आली आहे.

ट्रॉफी घेऊन पारितोषिक समारंभातून बाहेर पडलेल्या नक्वी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, माझ्या परवानगीशिवाय किंवा माझ्या उपस्थितीशिवाय ही ट्रॉफी हलवली जाऊ नये किंवा कोणालाही दिली जाऊ नये. नक्वी यांनी स्पष्ट केले आहे की, जेव्हा कधी (ट्रॉफी देण्याचा सोहळा) होईल, तेव्हा मी स्वतः ती भारतीय संघाला किंवा ‘बीसीसीआय’ला सुपूर्द करेन.

नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष तसेच पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असताना, भारतीय संघाने नक्वी यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन जाण्याच्या कृतीवर ‘बीसीसीआय’ने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि पुढील महिन्यात होणार्‍या ‘आयसीसी’च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचे ठरवले आहे.

नक्वी यांना ‘आयसीसी’च्या संचालकपदावरून हटविणार

‘बीसीसीआय’ नक्वी यांना ‘आयसीसी’च्या संचालकपदावरून दूर करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.

‘बीसीसीआय’चा स्पष्ट युक्तिवाद आहे की, आयोजनाचे यजमान असलेल्या ‘बीसीसीआय’कडे ट्रॉफी न पाठवता नक्वी यांनी ती स्वतःकडे ठेवण्याचा कोणताही अधिकार नव्हता. या संपूर्ण स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये तणावपूर्ण संबंध दिसून आले. कारण, भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT