Mohsin Naqvi Asia Cup Trophy Row :
आशिया कप ट्रॉफीचा वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. बीसीसीआयनं आशिया क्रिकेट काऊन्सीलला भारतानं जिंकलेली ट्रॉफी सोपवण्यास सांगितलं होतं. मात्र आशिया क्रिकेट काऊन्सीलचे सध्याचे चेअरमन पाकिस्तानी मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी नवं नाटक करत आता नवी मागणी केली आहे. हेच मोहसीन नक्वी फायनलनंतर टीम इंडियाची हक्काची ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन पळून गेले होते. आता ही ट्रॉफी आशिया क्रिकेट काऊन्सीलच्या ऑफिसमध्ये आहे.
आशिया कपच्या फायनल सामन्यात भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघानं पाकिस्तानी मंत्री असलेल्या मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर जवळपास एक तास बक्षीस वितरण सोहळ्याचा ड्रामा चालला. दरम्यान, नक्वी ट्रॉफी घेऊन गेले.
नक्वी यांनी टीम इंडियाला आपल्या हातूनच ट्रॉफी देण्याचा हट्ट अजूनही सोडलेला नाही. त्यांनी काल भारताला आपण ट्रॉफी देण्यास तयार आहोत मात्र त्यासाठी वेगळा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं आशिया क्रिकेट काऊन्सीलकडं भारताची ट्रॉफी पाठवून द्या अशी मागणी केली. मात्र नाटक करणाऱ्या नक्वींनी आता नवी टूम काढली आहे.
त्यांनी जर भारताला ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमार यादवनं आशिया क्रिकेट काऊन्सीलच्या ऑफिसमध्ये येऊन घेऊन जावी असं सांगितलं आहे. नक्वी यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची अपील देखील नाकारली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसीन नक्वी यांचं हे वागणं अत्यंत दुर्दैवी आणि खेळ भावनेच्या विरूद्ध आहे असं सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचा अर्थ तुम्ही ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन पळून जावं असा होत नाही. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच भारताला त्याची हक्काची ट्रॉफी मिळेल.'
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आशिया कपची ट्रॉफी भारताकडे सुपूर्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे. मात्र जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार एसीसीच्या बैठकीत याबाबत कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. आता हे प्रकरण आयसीसीत पोहचण्याची देखील शक्यता आहे.