स्पोर्ट्स

Asia Cup Team India : आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज, रोहित-गिलसह प्रमुख खेळाडू फिटनेस चाचणीत उत्तीर्ण

तंदुरुस्ती तपासणीसाठी यो-यो चाचणीसह डेक्सा स्कॅनचाही अवलंब, स्पर्धेत समाविष्ट नसलेले रोहित-सिराज-जैस्वाल-वॉशिंग्टन-शार्दूल देखील हंगामासाठी तंदुरुस्त

रणजित गायकवाड

बंगळूर : आगामी आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस चाचणीत शुभमन गिल, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह सर्व प्रमुख भारतीय खेळाडू यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. या चाचणीमुळे संघाच्या तयारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि गिल व्यतिरिक्त आशिया चषकासाठी संघात समाविष्ट नसलेल्या मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनीही ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली असून, ते आगामी हंगामासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या खेळाडूंना केवळ प्रमाणित ‘यो-यो’ चाचणीच नव्हे, तर ‘डेक्सा स्कॅन’लाही सामोरे जावे लागले. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये ‘यो-यो’ चाचणी अनिवार्य आहे. यामध्ये 20 मीटर अंतरावर ठेवलेल्या दोन शंकूंमध्ये विशिष्ट वेळेत धावायचे असते. सुरुवातीला कमी असलेला वेग हळूहळू वाढवला जातो, ज्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक सोशिकतेची परीक्षा घेतली जाते. दुसरीकडे, ‘डेक्सा स्कॅन’द्वारे शरीरातील हाडांची घनता, चरबीचे प्रमाण आणि स्नायूंचे वस्तुमान मोजले जाते. यामुळे खेळाडूंना होणार्‍या दुखापतींचा, विशेषतः फ्रॅक्चरचा धोका तपासण्यास मदत होते.

रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर वगळता, चाचणी दिलेले बहुतेक खेळाडू लवकरच 2025 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईला रवाना होणार आहेत. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होत असून, भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाविरुद्ध होणार आहे. तापाच्या कारणामुळे दुलीप ट्रॉफीमधून माघार घेतलेल्या शुभमन गिलसाठी ही चाचणी विशेष महत्त्वाची होती.

दरम्यान, रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. तो बंगळूरमध्येच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपला सराव सुरू ठेवणार आहे. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका ही त्याची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT