स्पोर्ट्स

Asia Cup Team India : सॅमसनच्या फॉर्ममुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव अडचणीत वाढ, कारण...

Sanju Samson : सूर्यासमोर संघाच्या सलामीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

रणजित गायकवाड

asia cup india captain suryakumar under pressure due to sanju samson

कोची : संजू सॅमसनचा आशिया चषक स्पर्धेपूर्वीचा जबरदस्त फॉर्म टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना सॅमसनने आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे त्याने मागील ४ सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावांच्या खेळी केल्या आहेत.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या टी-२० संघात संजू सॅमसन आणि शुभमन गिल या दोघांनाही स्थान मिळाले आहे. शुभमन गिलचे टी-२० संघात दीर्घकाळानंतर पुनरागमन झाले आहे. यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर संघाच्या सलामीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सॅमसनचा फॉर्म पाहता त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

सॅमसनची अलेप्पी रिपल्सविरुद्ध ८३ धावांची स्फोटक खेळी

सॅमसन सध्या केरळ क्रिकेट लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. अलेप्पी रिपल्स संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने ४१ चेंडूत ८३ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २०२.४४ होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर कोची संघाने १७७ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत सहज गाठले.

अलेप्पी रिपल्सच्या फलंदाजांची निराशा

या सामन्यात अलेप्पी रिपल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. त्यांच्याकडून अजहरुद्दीनने ६४ आणि जलज सक्सेनाने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याव्यतिरिक्त, अभिषेक नायरने २४ धावांचे योगदान दिले. पण या तिघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कोचीकडून केएम आसिफने सर्वाधिक ३ बळी घेतले.

केरळ लीगमध्ये सॅमसनची उत्कृष्ट कामगिरी

केरळ क्रिकेट लीगच्या या हंगामात सॅमसनने ५ डावांमध्ये १८६.८० च्या स्ट्राइक रेटने ३६८ धावा केल्या आहेत. मागील ४ सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १२१, ८९, ६२ आणि ८३ धावांची खेळी केली. आता आशिया कपमध्येही तो हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. त्याला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT