भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील महामुकाबला जसजसा जवळ येत आहे, तसतशी या सामन्यावर 'बहिष्कार' घालण्याची मागणी सोशल मीडियावर तीव्र होत आहे. रविवारी (दि. १४) देखील 'Bycott IND vs PAK Match' हा ट्रेंड सुरूच होता. मात्र, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा वाद केवळ जनतेपुरता मर्यादित नसून, त्याचा परिणाम भारतीय संघातील खेळाडूंवरही झाला आहे. रिपोर्टनुसार, कर्णधार सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि संघातील इतर युवा खेळाडूंवर या चर्चेचा मानसिक परिणाम झाला असून ते आतून खूप अस्वस्थ आहेत.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय खेळाडूंनी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्याशी संवाद साधला. या परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी मार्गदर्शन मागितले. जरी या खेळाडूंनी यापूर्वीही पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले असले, तरी यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. मैदानाबाहेरील वातावरण खेळाडूंसाठीही असामान्य आणि आव्हानात्मक बनले आहे.
या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी सहसा संघाचे प्रशिक्षक किंवा कर्णधार पत्रकार परिषदेत उपस्थित असतात, पण यावेळी असे झाले नाही. संघ व्यवस्थापनाने सहायक प्रशिक्षक रायन टेन डोएशकाटे यांना माध्यमांसमोर पाठवले. यावरून हे स्पष्ट होते की ड्रेसिंग रूममधील वातावरण सामान्य नाही.
पत्रकार परिषदेत डोएशकाटे यांना जेव्हा विचारण्यात आले की, ‘भारतीय खेळाडू भावनांसह मैदानात उतरतील का?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘हो, आम्हाला वाटते की ते असे करतील.’ ते पुढे म्हणाले, ‘हा एक खूपच संवेदनशील मुद्दा आहे. आम्हाला यात कोणतीही शंका नाही की आमचे खेळाडू भारतातील सामान्य जनतेच्या भावना पूर्णपणे समजतात आणि त्या अनुभवतात. आशिया चषक बराच काळ अनिश्चिततेच्या स्थितीत होता. काही क्षणांसाठी आम्हाला वाटले की ही स्पर्धा होणारच नाही. पण जसे की तुम्हाला माहीत आहे, सरकारचे जे धोरण आहे, ते आमच्यासमोर स्पष्ट आहे.’
डोएशकाटे म्हणाले, ‘लोकांच्या भावना किती तिव्र आहेत, हे आम्ही चांगल्या प्रकारे समजतो. पण त्याच वेळी आम्ही हे देखील मानतो की हे सर्व मागे सोडून आपल्याला पुढे जायला हवे. आमच्या खेळाडूंना पुन्हा एकदा देशासाठी खेळण्याची संधी मिळेल आणि ते पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतील, जे या परिस्थितीत शक्य आहे.’
डोएशकाटे यांनी शेवटी हे देखील सांगितले की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना काय संदेश दिला आहे. ते म्हणाले, ‘आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत. गौतम गंभीर यांचे मार्गदर्शन पूर्णपणे व्यावसायिक होते. त्यांनी खेळाडूंना सांगितले आहे की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्याकडे लक्ष देऊ नका. खेळाडूंना सांगितले आहे की जेव्हा क्रिकेट खेळायला मैदानात उतराल, तेव्हा भावनांना बाजूला ठेवून पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित करा. हे खेळाडू आता इतके अनुभवी आहेत की ते व्यावसायिक विचार करू शकतात. प्रत्येक खेळाडूच्या भावनांची तीव्रता वेगवेगळी असते. खेळाडूंनी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे आणि तो म्हणजे सामना.’