नवी दिल्ली : आशिया चषक २०२५ स्पर्धेला पुढील महिन्यात, म्हणजेच सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले असून, सहभागी संघांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. ते थेट आशिया चषक स्पर्धेतच मैदानावर उतरतील. अशा परिस्थितीत, या स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाची आशिया चषक स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. सध्या भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव सांभाळत आहेत, त्यामुळे या स्पर्धेतही त्याच्याकडेच नेतृत्व कायम राहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, एक महत्त्वाची घडामोड म्हणजे, मागील काही काळापासून टी-२० संघातून बाहेर असलेल्या शुभमन गिलचे संघात पुनरागमन होऊ शकते. सलामी फलंदाजीसाठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
यापूर्वी खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतासाठी सलामीची जबाबदारी सांभाळली होती. अभिषेक शर्मा सध्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्याला संघातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे, त्याच्यासोबत सलामीवीराची भूमिका कोण पार पाडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्या व्यतिरिक्त संजू सॅमसन याचेही संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याला पहिली पसंती दिली जाईल. दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या जागेसाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाचा समावेश केला जाऊ शकतो.
मधल्या फळीत अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळू शकते. गोलंदाजीचा विचार केल्यास, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे संघात खेळताना दिसू शकतात. विशेष म्हणजे, बऱ्याच काळापासून एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न खेळलेल्या जसप्रीत बुमराह याचाही संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. निवड समिती त्याच्या नावाचा विचार करते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
फलंदाज : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार)
यष्टीरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल
अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा