स्पोर्ट्स

AUS vs ENG 3rd Test : ‘ॲशेस’ वाचवण्यासाठी इंग्लंडची 'घातक चाल'! ॲडलेड कसोटीत 'या' खतरनाक खेळाडूला दिली संधी

Ashes Series : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होईल.

रणजित गायकवाड

  • AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १७ डिसेंबरपासून सुरू होईल.

  • Ashes Series : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

  • इंग्लंडचा संघ एका बदलासह ॲडलेडमध्ये मैदानात उतरेल.

ॲडलेड : ॲशेस मालिका (Ashes Series) वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) आता निर्णायक पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) १७ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपला अंतिम 'प्लेइंग इलेव्हन' जाहीर केला आहे आणि यात एक मोठा बदल करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांत ८-८ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला हा तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

गस एटकिन्सन बाहेर, जोश टंगची एंट्री

ॲडलेड कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात केवळ एक बदल केला आहे, पण हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मागील सामन्यात अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन याला संघाबाहेर करण्यात आले आहे. त्याने दोन्ही डावांत मिळून केवळ तीन बळी घेतले होते. त्याच्या जागी २८ वर्षीय धोकादायक वेगवान गोलंदाज जोश टंग (Josh Tongue) याची एंट्री झाली आहे.

भारताविरुद्ध झालेल्या कसोटीनंतर जोश टंग प्रथमच 'रेड बॉल' क्रिकेटमध्ये खेळताना दिसला. टंगने आतापर्यंत खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३१ बळी घेतले आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतलेल्या ५ महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. टंगच्या या एंट्रीने इंग्लिश संघाने ॲडलेडच्या खेळपट्टीवर आपली वेगवान गोलंदाजी अधिक धारदार करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्टोक्स आणि रूटवर लक्ष

मागील दोन्ही सामन्यांत इंग्लंडचे फलंदाज मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले. कर्णधार बेन स्टोक्स यालाही अष्टपैलू म्हणून आपली सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. मात्र, अनुभवी फलंदाज जो रूटने (Joe Root) दुसऱ्या कसोटीत १३८ धावांची दमदार शतकी खेळी करून आपण फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवले आहे. आता तिसऱ्या कसोटीतही त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्याला इंग्लंडच्या विजयासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे. तसेच फलंदाजांमध्ये जॅक क्रॉली, बेन डकेट आणि ओली पोप यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करावे लागेल.

ॲडलेड कसोटीसाठी इंग्लंडची अंतिम 'प्लेइंग इलेव्हन' :

  • जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, जोश टंग

मालिका वाचवण्याच्या या 'करो या मरो'च्या लढाईसाठी इंग्लंडने संघात केवळ एकच बदल करत आपले पत्ते उघडले आहेत. आता हा बदल इंग्लंडसाठी गेम चेंजर ठरणार का? की ऑस्ट्रेलिया ॲडलेडमध्ये विजयाची हॅटट्रिक करत ॲशेस मालिकेत निर्णायक आघाडी घेणार, हे १७ डिसेंबरपासून स्पष्ट होईल.

अ‍ॅशेस मालिकेतील उर्वरीत सामन्यांचे वेळापत्रक

  • तिसरी कसोटी : अ‍ॅडलेड ओव्हल (१७ डिसेंबर ते २१ डिसेंबर)

  • चौथी कसोटी : एमसीजी (२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर)

  • पाचवी कसोटी : एससीजी (४ जानेवारी ते ८ जानेवारी, २०२६)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT