Armless Cricketer Amir Lone Pudhari
स्पोर्ट्स

Watch: पायाने बॉलिंग, खांद्याने बॅटिंग… दोन्ही हात नसतानाही टाकतोय लेग स्पिन; सचिन तेंडुलकरही झाला थक्क

Armless Cricketer Amir Lone: हात नसतानाही आमिर हुसेन लोनने क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या जिद्दीने सचिन तेंडुलकरही प्रभावित झाला आणि त्याला प्रोत्साहन दिलं.

पुढारी वृत्तसेवा

Amir Hussain Lone Armless Cricketer Story Sachin Tendulkar Praised:

जम्मू-काश्मीरमधील एका छोट्याशा गावातल्या क्रिकेटरची ही कहाणी जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाची आहे. आमिर हुसेन लोन या हात नसलेल्या क्रिकेटपटूने कठीण परिस्थितीचा सामना करत स्वतःचा मार्ग तयार केला आणि आज तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अपघाताने बदललं आयुष्य

1997 साली, वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी आमिर आपल्या भावाला जेवण देण्यासाठी गेला होता. तेव्हा झालेल्या अपघातात त्याचे दोन्ही हात गेले. या घटनेनंतर केवळ शारीरिकच नाही, तर सामाजिक अडचणींचाही सामना करावा लागला. लोकांनी त्याच्या पालकांना त्याच्यावर पैसे खर्च करू नका, असंही सांगितलं. एका शिक्षकाने तर “अपंग मुलांसाठी शाळा नाही” असं स्पष्ट सांगितलं होतं.

हार मानली नाही

पण आमिरने हार मानली नाही. त्याने पायांच्या मदतीने दैनंदिन कामं करायला सुरुवात केली. लिहिणं, दाढी करणं, पोहणं… तो सगळी काम करायला शिकला. पण त्याचं खरं प्रेम क्रिकेट होतं. पण दोन्ही हात नसताना तो क्रिकेट कसं खेळणार असा प्रश्न होता. पण त्याने सराव केला. आता तो बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करु शकतो.

अनोखी क्रिकेट खेळण्याची शैली

बॅटिंग: तो बॅट खांदा आणि हनुवटीमध्ये अडकवून शरीराच्या हालचालींनी शॉट्स मारतो.

बॉलिंग: तो पायांच्या बोटांमध्ये चेंडू पकडून “कराटे स्टाईल” स्विंग करत लेग-स्पिन टाकतो आणि तोही अचूक. त्याची ही टेक्निक पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

‘क्रिकेटचा देव’ही आश्चर्यचकित झाला

आमिरची जिद्द पाहून सचिन तेंडूलकर देखील भारावून गेला. 2024 मध्ये सचिन स्वतः काश्मीरमध्ये जाऊन आमिरला भेटला. सचिनने त्याला सही केलेली बॅट भेट दिली आणि चॅरिटी सामन्यात त्याच्यासोबत ओपनिंगही केली. सचिनने त्याला सांगितलं “आमिर, क्रिकेट कधीही सोडू नकोस. तू यासाठीच बनला आहेस.”

आता इतरांसाठी शिकवतोय

आज 34 वर्षीय आमिर फक्त खेळाडू नाही, तर कोच बनला आहे. Adani Foundation कडून मिळालेल्या 67.6 लाखांच्या मदतीने तो आपल्या गावात क्रिकेट अकादमी उभारत आहे. बिजबेहारा येथे उभारली जाणारी ही इनडोअर क्रिकेट अकादमी विशेषतः गरीब आणि दिव्यांग मुलांसाठी आहे. इथे सुमारे 100 मुलांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. काश्मीरच्या थंड हवामानामुळे इनडोअर सुविधा देण्यात येणार आहे, जेणेकरून मुलांना वर्षभर सराव करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT