Arjun Tendulkar IPL debut
मुंबई : २६ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने 'लखनऊ सुपर जायंट्स' (LSG) कडून आपल्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. यंदाच्या हंगामातील लखनऊच्या शेवटच्या सामन्यात अर्जुनने टाकलेल्या उत्कृष्ट स्पेलने वडील सचिन तेंडुलकरचे मन जिंकले. यानंतर सचिनने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत मुलासाठी एक खास आणि भावूक पोस्ट केली आहे.
शनिवारी, २३ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरने लखनऊ सुपर जायंट्ससाठी पदार्पण केले. इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने आपल्या कोट्यातील संपूर्ण ४ षटके गोलंदाजी केली आणि एका उत्कृष्ट यॉर्करवर प्रभसिमरन सिंगची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
अर्जुनच्या या कामगिरीनंतर वडील सचिन तेंडुलकरने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने अर्जुनच्या कठोर परिश्रमांचे आणि खेळावरील प्रेमाचे कौतुक केले. सामना संपल्यानंतर लगेचच सचिनने सोशल मीडियावर ही भावूक पोस्ट शेअर केली. सचिन सहसा आपल्या मुलाच्या क्रिकेट प्रवासावर जाहीरपणे भाष्य करणे टाळतो. मात्र, चालू हंगामातील साखळी फेरीच्या अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहावी लागूनही, संयम न गमावता पडद्यामागे कठोर परिश्रम घेत राहिल्याबद्दल सचिनने अर्जुनचे कौतुक केले.
"खूप छान खेळलास अर्जुन! या संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळलेस, त्याचा मला अभिमान आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, संयम राखणे, शांतपणे कठोर परिश्रम करणे आणि अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहावी लागूनही सकारात्मक राहणे हे कौतुकास्पद आहे. क्रिकेट कौशल्याइतकीच तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते. आज तू या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळल्यास. नेहमीप्रमाणेच पाय जमिनीवर ठेव आणि खेळावर असेच प्रेम करत राहा. माझे तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील," असे सचिनने 'X' पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पंजाबच्या आक्रमणाचा धैर्याने सामना करत अर्जुनने अचूक आणि वेगवान यॉर्कर टाकला, ज्यावर प्रभसिमरन सिंग पूर्णपणे चकवा खाऊन एलबीडब्ल्यू (LBW) झाला. ६९ धावांवर खेळणाऱ्या प्रभसिमरनला बाद करत अर्जुनने आपली पहिली आयपीएल विकेट मिळवली. अर्जुनने टाकलेले डावातील १७ वे (आणि स्वतःचे अंतिम) षटकही तितकेच प्रभावी ठरले. डेथ ओव्हर्समध्ये दडपणाखाली गोलंदाजी करताना त्याने केवळ ५ धावा दिल्या. पंजाबने अखेर हे लक्ष्य गाठले असले, तरी अर्जुनने गोलंदाजीवर कमालीचे नियंत्रण दाखवले. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत १ बळी (४-०-३६-१) अशी कामगिरी केली.