Argentina file photo
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026: मेस्सीचा महाविक्रम, तरीही अर्जेंटिना हरता हरता वाचला; 'या' छोट्याशा देशाने अक्षरशः रडवले!

Argentina vs Cape Verde highlights: फिफा विश्वचषकात गतविजेत्या अर्जेंटिनाने अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात ३-२ असा पराभव करत 'राउंड ऑफ-१६' मध्ये धडक मारली आहे.

मोहन कारंडे

FIFA World Cup 2026 Argentina vs Cape Verde 2026 Lionel Messi

मियामी गार्डन्स: फिफा विश्वचषकात गतविजेत्या अर्जेंटिनाने अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात केप व्हर्डेचा ३-२ असा पराभव करत 'राउंड ऑफ-१६' मध्ये धडक मारली आहे. मियामी गार्डन्स येथे शनिवारी झालेल्या या थरारक सामन्यात, पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने अर्जेंटिनाला विजयासाठी रक्ताचे पाणी करायला लावले. अखेर एक्स्ट्रा टाईमच्या १११ व्या मिनिटाला झालेल्या एका 'ओन गोल'मुळे गतविजेत्या अर्जेंटिने विजय साकारला.

अखेरच्या क्षणी 'ओन गोल' ठरला निर्णायक

सामन्यात दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत असताना १११ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या क्रिस्टियन रोमेरोने मारलेला हेडर रोखण्याच्या प्रयत्नात केप व्हर्डेचा डिफेंडर डॅनी बोर्जेस याच्याकडून मोठी चूक झाली. चेंडू बोर्जेसला लागून थेट त्यांच्याच गोलपोस्टमध्ये गेला. या 'ओन गोल'मुळे अर्जेंटिनाला ३-२ अशी निर्णायक आघाडी मिळाली, जी त्यांनी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत टिकवून ठेवली.

त्यापूर्वी, कर्णधार लिओनेल मेस्सीने २९ व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले होते. तर लिसांद्रो मार्टिनेझने एक्स्ट्रा टाईमच्या १०३ व्या मिनिटाला गोल करत संघाला २-१ असे पुढे नेले होते.

केप व्हर्डेने जिंकली फुटबॉल रसिकांची मने

पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेल्या या छोट्याशा द्वीपसमूह देशाने पराभवानंतरही आपल्या ऐतिहासिक कामगिरीने सर्वांची मने जिंकली. दोनदा पिछाडीवर पडल्यानंतरही केप व्हर्डेने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. सिडनी लोपेस कॅब्राल आणि डेरॉय डुआर्टे यांनी प्रत्येकी एक गोल डागत अर्जेंटिनाच्या गोटात कमालीची शांतता पसरवली होती.

केप व्हर्डेचा ४० वर्षीय अनुभवी गोलकीपर 'वोजिन्हा' या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने मेस्सीचे ५ चपळ प्रयत्न हाणून पाडत एकूण १० अप्रतिम 'सेव्ह्स' केले. यापूर्वी केप व्हर्डेने साखळी फेरीत स्पेन, उरुग्वे आणि सौदी अरेबियासारख्या बलाढ्य संघांना बरोबरीत रोखून आधीच इतिहास रचला होता.

मेस्सीचा महाविक्रम; एम्बाप्पेला टाकले मागे

सामन्याच्या २९ व्या मिनिटाला लिसांद्रो मार्टिनेझच्या पासवर मेस्सीने गोलकीपर वोजिन्हाच्या डोक्यावरून चेंडू नेटमध्ये धाडला. हा मेस्सीच्या कारकिर्दीतील २० वा विश्वचषक गोल ठरला, तर चालू स्पर्धेतील हा त्याचा ७ वा गोल आहे. या गोलसह मेस्सीने 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेवर एका गोलची आघाडी घेतली आहे. तसेच, सलग ८ विश्वचषक सामन्यांत गोल करण्याचा पराक्रम करत मेस्सीने एकूण १२ गोल नोंदवले आहेत.

आता 'राउंड ऑफ-१६' मध्ये इजिप्तशी लढणार

या थरारक विजयानंतर आता राउंड ऑफ-१६ मध्ये अर्जेंटिनाचा सामना इजिप्तविरुद्ध होणार आहे. इजिप्तने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांमधील महामुकाबला आगामी मंगळवारी अटलांटा येथे खेळवला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT