Amit Mishra Retirement : भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं आपल्या २५ वर्षाचा प्रदीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाची दारं बंद झाल्यावर तो आयपीएल खेळत होता. आता त्यानं सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
अमित मिश्राने भारताकडून २२ कसोटी सामने खेळले आहेत. तर ३६ वनडे सामन्यात देखील त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं. टी २० क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला देशाकडून १० सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानं २००३ मध्ये आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती. त्याने देशाकडून २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळला. कसोटीत अमित मिश्राच्या नावावर ७६ विकेट्स आहेत तर वनडेमध्ये ६८ आणि टी २० मध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या रेकॉर्ड्सबद्दल बोलायचं झालं तर त्यानं १७४ विकेट्स घेतल्या.
अमित मिश्राने ट्वीट करून आपण सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'आज मी माझी २५ वर्षाची क्रिकेट कारकीर्द संपवली आहे. मी निवृत्तीची घोषणा करतो. हा खेळ हे माझं पहिलं प्रेम, पहिला शिक्षक आणि आनंदाचा सर्वोत्तम स्त्रोत होता. माझा हा प्रवास असंख्य भावनिक क्षण, अभिमान, कष्ट, शिकवण आणि प्रेम यांनी भरलेला आहे. मी बीसीसीआय आणि हरियाणा क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभारी आभारी आहे. तसंच मी माझे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, सहकारी आणि सर्वात महत्वाचे असे फॅन्स यांचे देखील आभार मानतो. यांनी दाखवलेला विश्वास आणि पाठिंबा प्रत्येक क्षणी मला ताकद देत होता.
अमित मिश्रानं आपल्या निवृत्तीच्या नोटमध्ये आपल्या फ्युचर प्लॅनबाबत देखील एक हिंट दिली. तो म्हणतो, हा अध्याय मी संपवलाय. माझ्या मनात कृतज्ञ भाव आणि प्रेम आहे. क्रिकेटनं मला सर्व काही दिलं. आता मी खेळासाठी काहीतरी योगदान देण्याचा विचार करत आहे. आज मी जे काही आहे ते खेळामुळंच आहे.
अमित मिश्रा आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसला. त्यानं आयपीएलमध्ये १६२ सामन्यात २३.८२ च्या सरासरीनं १७४ विकेट्स घेतल्या. याचबरोबर आयपीएलमध्ये तीन हॅटट्रिक घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. आयपीएल इतिहासात तीनवेळा हॅटट्रिक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला.