अॅडम झॅम्पाला आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने संघातून मुक्त केले होते. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी न करता पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता.
Adam Zampa PSL
लाहोर : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू आहे. याचवेळी पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे सामने खेळवले जात आहेत. यंदाच्या हंगामात पीएसएलमध्ये विदेशी खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे. आयपीएलमध्ये दिसणारे क्रिकेटपटू आता पीएसएलमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. याबाबत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झॅम्पा याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अॅडम झॅम्पाला आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने संघातून मुक्त केले होते. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी न करता पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. झॅम्पाने यापूर्वी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने २२ सामन्यांत ३१ बळी घेतले आहेत.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी (दि. २९ मार्च) गडाफी स्टेडियमवर कराची किंग्स विरुद्ध लाहोर कलंदर्सविरुद्ध सामना झाला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदर्सविरुद्ध झॅम्पाने ४ षटकांमध्ये एक निर्धाव टाकत केवळ ११ धावा देऊन २ बळी घेतले. या दमदार कामगिरीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
IPL सोडून पाकिस्तानचे PSL निवडण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल स्पष्टपणे बोलताना झॅम्पा म्हणाला, "खरं सांगायचं तर, मी यावर्षी आयपीएलमधून माघार घेतली. माझ्याकडे असणाऱ्या कौशल्यास आयपीएलमध्ये इतर खेळाडूंच्या तुलनेत तितकी मोठी रक्कम मिळत नाही. आयपीएलसाठी द्यावा लागणारा वेळ पाहता, तिथे खेळत राहणे मला फायदेशीर वाटले नाही."
आयपीएल लिलावातून बाहेर पडल्यानंतर मी सुरुवातीला विश्रांती घेण्याचे ठरवले होते; पण महिनाभरापूर्वी पीएसएलचा प्रस्ताव आला. हे सर्व खूप घाईत झाले असले तरी, मी सध्या या स्पर्धेचा आनंद घेत असल्याचेही झॅम्पाने सांगितले.