मुंबई : भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका अत्यंत खराब ठरली आहे. या मालिकेतील चार सामन्यांपैकी दोन वेळा तो 'गोल्डन डक'वर (पहिल्याच चेंडूवर बाद) बाद झाला असून, असा नकोसा विक्रम करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. या कामगिरीमुळे त्याने विराट कोहली, शुभमन गिल, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला आणि भारताच्या पदरी ५० धावांनी पराभव पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली, तसेच मर्यादित फलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय टीम इंडियाला महागात पडला. भारताचा पराभव करून न्यूझीलंडने सलग तीन पराभवांनंतर या मालिकेत पहिला विजय नोंदवला.
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या ४ सामन्यांपैकी २ सामन्यांत 'गोल्डन डक'ची नोंद केली. मालिकेतील दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. एकाच आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत दोन वेळा 'गोल्डन डक'वर बाद होणारा अभिषेक हा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय सलामीवीराच्या नावे अशा प्रकारच्या कामगिरीची नोंद नव्हती.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दोन वेळा 'गोल्डन डक'वर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अभिषेक शर्माने रोहित शर्मा, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांची बरोबरी केली आहे. मात्र, एकाच मालिकेत दोन वेळा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याने विराट कोहली, शुभमन गिल, शिखर धवन, पृथ्वी शॉ, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांना मागे टाकले आहे. हे सर्व खेळाडू सलामीवीर म्हणून टी-२० मध्ये प्रत्येकी एकदाच 'गोल्डन डक'चे बळी ठरले होते.