स्पोर्ट्स

Abhishek Sharma Injury Controversy : अभिषेक शर्माच्या दुखापतीवरून मोठी फसवणूक? टीम इंडियाने लपवले मोठे सत्य

Team India T20 World Cup : अभिषेकच्या पोटात संसर्ग झाला नव्हता तर त्याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे, ज्याने क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

रणजित गायकवाड

Abhishek Sharma Injury Controversy

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याची कामगिरी आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिली आहे. याच दरम्यान, अभिषेकच्या दुखापतीबाबत एक असा खळबळजनक दावा समोर आला आहे, ज्याने क्रिकेट वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणधुमाळीत सलामीवीर अभिषेक शर्माबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच अभिषेकला गंभीर दुखापत झाली होती, मात्र संघ व्यवस्थापनाने ही बाब गोपनीय ठेवली आणि दुखापतग्रस्त असूनही तो पहिल्या सामन्यात फलंदाजीला उतरला, असा दावा केला जात आहे. चालू विश्वचषकात अभिषेकची बॅट पूर्णपणे शांत असून ४ सामन्यांत त्याने केवळ १५ धावा केल्या आहेत. त्याच्या या खराब फॉर्ममागे हीच लपवलेली दुखापत कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

काय आहे 'ते' लपवलेले सत्य?

काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, संघाच्या अधिकृत फोटोशूट दरम्यान अभिषेकच्या हाताला खोल जखम झाली होती. हा अपघात इतका गंभीर होता की त्याच्या हाताला टाके घालावे लागले होते. असे असूनही, दुखापतीची पर्वा न करता अभिषेक अमेरिकेविरुद्धच्या (USA) पहिल्या सामन्यात मैदानात उतरला. या सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. मात्र, इतकी गंभीर दुखापत झालेली असतानाही त्याला खेळवण्याचा धोका का पत्करला गेला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मैदानाबाहेर असण्याचे दिले होते वेगळे कारण

दुसऱ्या सामन्यात अभिषेक भारतीय संघाचा भाग नव्हता, मात्र त्यावेळी संघ व्यवस्थापनाकडून त्याच्या प्रकृतीबाबत वेगळीच माहिती देण्यात आली होती. 'पोटातील संसर्गामुळे' तो नामीबियाविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही, असे सांगण्यात आले होते. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर अभिषेकला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, पण त्याचे कारणही पोटदुखी असल्याचेच भासवले गेले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यातून त्याने मैदानात पुनरागमन केले. मात्र, आता समोर आलेल्या दुखापतीच्या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

फॉर्मशी झगडतोय अभिषेक शर्मा

अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आतापर्यंत एखाद्या स्वप्नवत धक्क्यासारखा ठरला आहे. त्याने ४ सामन्यांत मिळून अवघ्या १५ धावा केल्या आहेत, ज्या केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आल्या होत्या. उर्वरित तिन्ही सामन्यांत तो शून्यावर बाद झाला आहे. या खराब कामगिरीनंतर आता चाहते त्याच्या फॉर्मचा संबंध या लपवलेल्या दुखापतीशी जोडताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT