नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौऱ्यावर फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देत जोरदार कमबॅक केले आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात त्याने ऐतिहासिक आणि वादळी खेळी साकारली. षटकारांचा पाऊस पाडत अभिषेकने अवघ्या ४० चेंडूंत तडाखेबंद द्विशतक झळकावण्याची किमया केली आहे. त्याच्या या तुफानी खेळीचे क्रीडा जगतातून प्रचंड कौतुक होत आहे.
पंजाबमध्ये सुरू असलेल्या 'पंजाब आंतर-जिल्हा सीनियर स्पर्धा २०२६-२०२७' मध्ये रविवारी अमृतसर संघाकडून खेळताना अभिषेक शर्माने तरनतारन संघाविरुद्ध फलंदाजीत कहर माजवला. अमृतसरच्या मैदानावर त्याच्या आक्रमक फटकेबाजीसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज पार हतबल झालेले पाहायला मिळाले. २५६.०४ च्या अत्यंत स्फोटक स्ट्राइक रेटने धावा कुटत त्याने हे तडाखेबंद द्विशतक पूर्ण केले. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यातील अपयशाची गडद सावली दूर सारत आपण पूर्ण फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे.
२ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या सामन्यात अभिषेकने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि २५ उत्तुंग षटकार खेचत अवघ्या ९१ चेंडूंत २३३ धावांची अतिमानवी खेळी साकारली. त्याच्या या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर अमृतसर संघाने निर्धारित ५० षटकांत ८ गडी गमावून ५३३ धावांचा महाकाय डोंगर उभारला.
या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना तरनतारनचा संघ ३१३ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि अमृतसरने २२० धावांच्या भक्कम फरकाने सामना आपल्या नावे केला. तरनतारनकडून अर्शदीप सिंगने १०८ धावांची झुंज देणारी खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिषेक शर्मानेच त्याची महत्त्वपूर्ण विकेट घेत तरनतारनच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फेरले.
मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माची बॅट शांत होती. इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत त्याला अवघ्या ११ धावा करता आल्या होत्या, तर त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने २६.२ च्या सरासरीने १३१ धावा केल्या होत्या. आपल्या शेवटच्या १० आंतरराष्ट्रीय टी-२० पार्यांमध्ये त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले होते.
सातत्याने खराब कामगिरी होत असल्याने त्याच्यावर चौफेर टीका होत होती. मात्र, या द्विशतकी धमाक्याने त्याने पुन्हा एकदा निवड समितीचे आणि क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.