RCB IPL 2026 Prediction Pudhari
स्पोर्ट्स

RCB IPL 2026: आरसीबी सलग 2-3 ट्रॉफी जिंकू शकते, विराट कोहलीचं कौतुक करत कोणी केली भविष्यवाणी?

RCB IPL 2026 Prediction: एबी डिव्हिलियर्सच्या मते, RCB संघ आता इतका मजबूत झाला आहे की तो सलग 2-3 IPL ट्रॉफी जिंकू शकतो. विराट कोहलीवरचं ओझं कमी झालं असून संघात चांगले खेळाडू आहेत.

Rahul Shelke

RCB IPL 2026 Prediction AB DE Villiers Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि विराट कोहलीबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, सध्याची RCB टीम इतकी संतुलित आहे की ती आगामी IPL हंगामात सलग दोन-तीन ट्रॉफी जिंकू शकते.

डिव्हिलियर्सने सांगितलं की, यंदा विराट कोहलीवर संघाचं ओझं उचलण्याची गरज राहणार नाही. संघात आता चांगले खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे कोहली अधिक मोकळेपणाने खेळू शकणार आहे आणि संघालाही त्याचा फायदा होईल.

गेल्या हंगामात RCB ने 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपद पटकावलं होतं. आता ते विजेतेपद टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मात्र डिव्हिलियर्सच्या मते, सध्याची टीम जवळपास तशीच असल्याने मोठे बदल करण्याची गरज नाही आणि त्यामुळे सातत्य राखण्याची संधी आहे.

कोहली जानेवारीपासून ब्रेकवर असला तरी IPL मध्ये तो पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे, असा विश्वासही डिव्हिलियर्सने व्यक्त केला. “मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये विराट सर्वात मेहनती आहे. तो कधीही अपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार नाही,” असं तो म्हणाला.

डिव्हिलियर्सने कोहलीच्या जुन्या वक्तव्याचीही आठवण करून दिली. “जर आपण एकदा जिंकू शकतो, तर दोन-तीन वेळाही जिंकू शकतो,” असं कोहली ड्रेसिंग रूममध्ये म्हणायचा, असं त्याने सांगितलं. त्याच्या मते, RCB आता अशा टप्प्यावर पोहचली आहे जिथे ते सलग विजेतेपदासाठीचे दावेदार मानले जात आहेत.

दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनेही कोहलीच्या फलंदाजीबद्दल महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्याच्या मते, या हंगामात कोहली काही नवीन शॉट्स, जसं की ‘स्कूप’ किंवा ‘रिव्हर्स स्कूप’, वापरताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. “महान खेळाडू नेहमी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतात,” असं कुंबळेने म्हटलं आहे.

RCB च्या सध्याच्या संघरचनेवर आणि कोहलीच्या फॉर्मवर डिव्हिलियर्स आणि कुंबळे यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे IPL 2026 मध्ये RCB पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करेल का, याकडे आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT