IPL Rule Changes: आयपीएल 2026 चा थरार शिगेला पोहोचला असतानाच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने क्रिकेट आणखी रोमांचक करण्यासाठी काही भन्नाट नियम बदलण्याचे सुचवले आहेत. हे नियम लागू झाले तर टी-20 क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडू शकते.
सध्या आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व अधिक दिसते. सपाट खेळपट्ट्या, चौकार-षटकारांचा धुमाकूळ आणि गोलंदाजांची होणारी धुलाई हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. यामुळे खेळात समतोल आणण्यासाठी आकाश चोप्रांनी बीसीसीआयसमोर काही हटके प्रस्ताव ठेवले आहेत.
पहिला नियम – गोलंदाजांना एक अतिरिक्त ओव्हर
आकाश चोप्रांच्या मते, जर एखाद्या गोलंदाजाने सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या तर त्याला एक अतिरिक्त ओव्हर टाकण्याची परवानगी मिळायला हवी. सध्या टी-20 क्रिकेटमध्ये कोणताही गोलंदाज जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकू शकतो. मात्र, जर एखादा गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असेल आणि विकेट घेत असेल, तर त्याला पाचवी ओव्हर द्यावी, असे त्यांचे मत आहे. यामुळे गोलंदाजांनाही अधिक संधी मिळेल आणि फलंदाजांचे एकहाती वर्चस्व कमी होईल.
दुसरा नियम - बोनस पॉइंट
आकाश चोप्रांनी आणखी एक महत्त्वाचा बदल सुचवला आहे. लीग स्टेजमध्ये एखाद्या संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर त्या संघाला अतिरिक्त गुण मिळायला हवेत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने 15-16 षटकांत लक्ष्य गाठले किंवा प्रतिस्पर्धी संघाला 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरवले, तर त्या संघाला नेहमीच्या 2 गुणांऐवजी 3 गुण द्यावेत. यामुळे संघ केवळ विजयासाठी नाही, तर दमदार विजयासाठीही अधिक आक्रमक खेळतील.
आकाश चोप्राच्या सर्वात चर्चेत असलेल्या सूचनेनुसार, जर फलंदाजाने 100 मीटर किंवा त्यापेक्षा लांब षटकार मारला, तर त्याला 6 ऐवजी 8 धावा द्याव्यात. यामुळे मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांना अधिक बक्षीस मिळेल आणि सामन्यात आणखी रोमांच निर्माण होईल.
जर भविष्यात अशा नियमांवर चर्चा झाली, तर क्रिकेटचा चेहरामोहरा बदलू शकतो. आता प्रश्न असा आहे की, चाहत्यांना हे बदल कितपत आवडतील?