नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना स्मृती मानधनाने मंगळवारी वादळी शतक झळकावले. 'बीसीसीआय'च्या वरिष्ठ आंतरविभागीय महिला वन-डे स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व सांभाळताना स्मृतीने कॅप्टन्स इनिंग खेळली. तिच्या शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने 7 विकेटस् व 49 चेंडू राखून पूर्व विभाग संघाचा सहज पराभव केला. पश्चिम विभागाच्या विजयात ओपनर यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही हातभार लावला. (Smriti Mandhana)
पूर्व विभागाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 264 धावा उभ्या केल्या. कर्णधार दीप्तीने 137 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. उमा चेत्रीने 49 चेंडूंत 54 धावा केल्या, तर सुश्री दिव्यादर्शनी (31) व जिंतिमणी कलिता (26) यांनी धावसंख्येत योगदान दिले. पश्चिम विभागाच्या ए. पाटीलने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या आणि पूर्व विभागाच्या मधल्या फळीला हतबल केले. सायली सातघरेने दोन, तर एस. पोखरकर व पी. नाईक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Smriti Mandhana)
लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यास्तिका 45 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 42 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमासह दुसर्या विकेटसाठी स्मृतीने 154 धावा जोडल्या. स्मृती 118 चेंडूंत 136 धावांवर बाद झाली. तिने 15 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 20 चेंडूंत 90 धावा कुटल्या. जेमिमाच्या खेळीला 72 धावांवर (79 चेंडू) ब्रेक लागला. तोपर्यंत पूर्व विभागाच्या हातून सामना निसटला होता. पश्चिम विभागाने 41.5 षटकांत 3 बाद 265 धावा करून बाजी मारली.
हेही वाचा :