Olympics 2028 cricket qualification : इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने (IOC) २०२८ मध्ये लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक गेम्समधील क्रिकेट स्पर्धेसाठीच्या 'क्वालिफिकेशन सिस्टीम'ला (पात्रता निकष) मंजुरी दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होत असून, महिला आणि पुरुष दोन्ही गटांत टी-२० (T20) फॉरमॅटमध्ये प्रत्येकी ६ संघ सुवर्णपदकासाठी मैदानात उतरतील.
या स्पर्धेत आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या चार खंडांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले आहे. पाच पात्रता जागा सध्याच्या आयसीसी स्पर्धा आणि टी-२० आय (T20I) रँकिंगच्या आधारे ठरवल्या जातील, ज्या सध्याच्या मान्यताप्राप्त आराखड्यानुसार असतील. पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील सहावी आणि अंतिम जागा २०२७ मध्ये होणाऱ्या नवीन 'आयसीसी ऑलिम्पिक क्वालिफायर' स्पर्धेतून निश्चित केली जाईल.
भारतीय महिला क्रिकेट संघाने 'आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६' च्या माध्यमातून ऑलिम्पिकसाठी थेट क्वालिफाय केले आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांचे स्थान पक्के झाले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या महिला वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सेमीफायनल गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाला ऑलिम्पिक पात्रतेसाठी आणखी ६ महिने वाट पाहावी लागेल. यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही कट-ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारताला थेट क्वालिफाय करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आशिया खंडात अव्वल स्थानी राहावे लागेल. भारतीय पुरुष संघाला नुकतेच आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऐतिहासिक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) स्पष्ट केले की, "ऑलिम्पिकमध्ये 'ग्रेट ब्रिटन' म्हणून सहभाग घेतला जातो, त्यामुळे हा कोटा केवळ एकाच ब्रिटिश देशाला म्हणजेच इंग्लंडला दिला जाईल. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघही इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. मात्र, विविध कॅरेबियन देशांचे प्रतिनिधित्व करणारा आयसीसी सदस्य असूनही, वेस्ट इंडिजला आयओसीच्या (IOC) 'राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती' (NOC) म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ ऑलिम्पिक खेळांमध्ये थेट भाग घेण्यास किंवा एक स्वतंत्र युनिट म्हणून कोटा मिळवण्यास पात्र नाही.
यजमान देश असल्याने अमेरिकेला पुरुष आणि महिला दोन्ही गटांत प्रत्येकी एक कोटा मिळेल; कारण पात्रता कालावधीत रँकिंगमध्ये अव्वल १५ किंवा त्यापेक्षा चांगल्या स्थानावर राहण्याचा आयसीसीचा निकष अमेरिकेने पूर्ण केला आहे.