Cricket One Ball 286 Runs Unbelievable Record 1894:
क्रिकेटला नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कारण प्रत्येक चेंडूवर काहीही घडू शकतं. पण जर सांगितलं की क्रिकेटच्या इतिहासात कधीतरी एका चेंडूत तब्बल 286 धावा झाल्या होत्या, तर तुम्हाला खोटं वाटेल! मात्र, हा किस्सा खरा आहे आणि आजही क्रिकेटच्या इतिहासात नोंदलेला एकमेव विक्रम आहे.
ही घटना 15 जानेवारी 1894 रोजी ऑस्ट्रेलियातील बनबरी (Bunbury) मैदानावर घडली. त्या वेळी विक्टोरिया आणि स्क्रॅच XI (ऑस्ट्रेलियातील एक स्थानिक संघ) यांच्यात सामना सुरू होता. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर असं घडलं की ज्यावर विश्वास ठेवणं आजही कठीण आहे.
बॅट्समनने जोरदार फटका मारला, पण चेंडू सीमारेषेबाहेर न जाता मैदानाच्या मधोमध उभ्या असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन फसला. नियमांनुसार, चेंडू ‘लॉस्ट बॉल’ (हरवलेला चेंडू) तेव्हाच घोषित होतो जेव्हा तो मैदानावरील खेळाडूंना दिसेनासा होतो. पण येथे चेंडू झाडावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळे अंपायरांनी तो लॉस्ट बॉल घोषित करण्यास नकार दिला.
हीच संधी साधून दोन्ही फलंदाजांनी धावा घेणं सुरू केलं. फिल्डर्स झाडाखाली उभे राहून निराशेने चेंडूकडे पाहत राहिले. दरम्यान, फलंदाज सतत क्रीजदरम्यान धावत राहिले आणि सुमारे 6 किलोमीटरचं अंतर कापत 286 धावा केल्या. फिल्डिंग करणारे खेळाडू थक्क झाले, कारण ना चेंडू खाली येत होता, ना धावा थांबत होत्या!
या हास्यास्पद पण ऐतिहासिक प्रसंगातून सुटका मिळवण्यासाठी फिल्डिंग टीमने झाडावर चढण्याचा आणि झाड कापण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाही कुऱ्हाड मिळाली नाही. अखेर एका खेळाडूने मैदानाबाहेरून रायफल आणली आणि झाडावर अडकलेल्या चेंडूवर गोळी मारुन तो खाली पाडला.
तोपर्यंत विक्टोरिया टीमने 286 धावा पूर्ण केल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यांनी ह्याच स्कोरवर आपला पहिला डाव घोषित केला. असं म्हणतात की रायफलने गोळी झाडली नसती, तर स्कोर 300 पार गेला असता.
ही अनोखी घटना जगासमोर आणणारा एकमेव स्रोत म्हणजे त्या काळातील ‘पॉल मॉल गॅझेट’ (Pall Mall Gazette) हे इंग्रजी वृत्तपत्र. या घटनेचा अधिकृत पुरावा आजही त्याच वृत्तपत्रात आढळतो.
हा विक्रम आजही कोणालाही मोडता आलेला नाही आणि कदाचित कधीही मोडला जाणार नाही. कारण आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये अशा घटनेसाठी ना झाडं आहेत, ना वेळ! तरीही, 1894 मध्ये त्या दिवशी झालेला “एकाच चेंडूवर 286 धावा” हा विक्रम अजूनही क्रिकेट चाहत्यांना थक्क करतो.