Latest

पालक उत्पादनाचे तंत्र : पालकाची फायदेशीर शेती कशी करावी?

backup backup

सर्वसामान्यांना परवडणार्‍या भाज्यांमध्ये पालकचा समावेश आहे. त्यामुळेच पालक भाजीची लोकप्रियता अधिक आहे. वर्षभरात केव्हाही या भाजीची लागवड करता येते. पालकच्या लागवडीतून शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळवता येते; पण याची लागवड करताना त्याचे उत्पादन तंत्र समजून घेेणे आवश्यक आहे.

पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाल्याची लागवड वर्षभर करता येते. या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषकमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. पालकामध्ये पचनशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. पॉप्पाय द सेलर मॅन ही कार्टून मालिका लहान मुलांमध्ये अतिशय प्रिय असून त्याचा हीरो पॉप्पाय हा कायम पालक खाताना दाखवला जातो. पालक खाऊन त्याला येणारी शक्ती अफलातून असते. पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या शिवाय प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी आमटी, सूप, भजी इत्यादींमध्ये करतात.

पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक आहे. महाराष्ट्रात कडक उन्हाचे दोन-तीन महिने वगळून याची वर्षभर लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचा दर्जा चांगला राहतो आणि उत्पादनही भरघोस येते. तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोर्‍यावर येते आणि पालकाचा दर्जाही खालावतो. पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके घेता येत नाहीत तेथे पालकाचे पीक हमखास येते.

पालक ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या पालकाच्या भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित केलेल्या सुधारित जाती आहेत. महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जुन-जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्याहप्त्याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्याने जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे. नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वापसा आल्यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळीत पंचवीस ते तीस सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो. त्यामुळे पिकाचा दर्जाही खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यामुळे मररोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25 ते 30 किलो बियाणे लागते.

पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असते. यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमीत पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे. पालकाच्या पिकाला हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद, 80 किलो पालांश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालांश आणि एक तृतियांश (1/3) नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र दोन समान विभागातून पहिल्या आणि दुसर्‍या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातींमध्ये दोनपेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे.

पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढवण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5 टक्के युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. किंवा वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या दोन-तीन दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.

पालकावर मावा, पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे यांचा उपद्रव आढळतो. या किडींच्या नियंत्रणासाठी पीक लहान अदतानाच 8-10 दिवसांच्या अंतराने 15 मिली. एंडोसल्फान (35 टक्के प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. काढणीच्या 8/10 दिवस आधी फवारणी करू नये. पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा, केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी. केवडा आणि तांबोरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही. शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो.

पेरणीनंतर सुमारे 1 महिन्याने पालक कापणीला तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खुडून घ्यावा. पानांच्या जुड्या बांधाव्यात. त्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने जातीनुसार 3-4 किंवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत. कापणी करतानाच खराब रोपे बाजूला काडून जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर पालक लगेचच बाजारात पाठवावा. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूंच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपलीच्या खाली आणि वर कडुनिंबाचा पाला ठेवल्यास पालक लवकर खराब होत नाही. वाहतुकीत जुड्यांवर अधुनमधून थंड पाणी शिंपडल्यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र, पाणी जास्त झाल्यास सडण्याची क्रिया सुरू होते. म्हणून जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये. पिकाच्या लागवडीची जात, वेळ, खुडे आणि पिकाची योग्य काळजी यावर पालकाचे उत्पादन अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी 10 ते 15 टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन 1.5 टनांपर्यंत मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT