पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. जिथे टीम इंडियाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात अनेक मोठे बदल करण्यात आले असून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेच्या जबाबदारीतही वाढ करण्यात आली आहे. त्याला उपकर्णधार करण्यात आले आहे. डब्ल्यूटीच्या अंतिम सामन्यातून रहाणेने तब्बल 18 महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन केले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्या सामान्यात रहाणेने चमकदार कामगिरी केली. त्याचा मोबदला त्याला मिळाला. विंडिज दौ-यातील कसोटी मालिकेसाठी त्याला थेट उपकर्णधार पदी बढती मिळाली. मात्र, त्याच्या निवडीनंतर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
35 वर्षीय रहाणे दीड वर्ष संघाबाहेर होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये त्याने पहिल्या डावात 89 आणि 46 धावा केल्या. त्या सामन्यात तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला. मात्र, या एका कसोटीनंतर शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने रहाणेची विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून पुन्हा नियुक्ती केली.
दरम्यान, रहाणेला उपकर्णधार करण्यावरून गांगुलींनी तिखट प्रतिक्रिया दिली. शुभमन गिलसारख्या व्यक्तीला उपकर्णधार म्हणून तयार करणे योग्य नाही का? असा प्रश्न पीटीआयच्या पत्रकाराकडून विचारला असता, 'हो, मला तसंच वाटतं. रहाणे 18 महिने बाहेर होता. त्यानंतर एक कसोटी सामना खेळला. त्याने चमकदार कामगिरी केली. पण त्यानंतर त्याला निवड समितीने थेट उपकर्णधार केले. आपल्याकडे रवींद्र जडेजा आहे, जो दीर्घकाळ कसोटी खेळत आहे. रहाणेची उपकर्णधारपदी निवड करण्यामागची रणनिती मला समजली नाही.'
'मला यावर एवढेच म्हणायचे आहे की निवड समितीने अशा निर्णयांवर अधिक चांगला विचार करावा. यामध्ये सातत्य असायला हवे.' असा सल्ला देत 'निवडकर्त्यांनी पुजाराबद्दल स्पष्ट असले पाहिजे. पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये खेळवायचे आहे की युवा खेळाडूंची निवड करून संघाची नव्याने बांधणी करायची आहे?' असा सवालही गांगुलींनी (Sourav Ganguly) निवड समितीला केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, पुजाराला पहिला ड्रॉप केले, त्यानंतर त्याची पुन्हा निवड केली. पुन्हा त्याला बाहेर बसवले. पुजारासारख्या तसेच रहाणेसारख्या खेळाडूसोबत तुम्ही असे करू शकत नाही,' असेही गांगुलींनी मत व्यक्त केले.
गांगुली म्हणाले, 'मला वाटते यशस्वी जैस्वालने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्यामुळेच तो संघात आहे. सरफराज खानलाही संधी द्यायला हवी होती, त्यानेही गेल्या तीन वर्षांत खूप धावा केल्या आहेत.'