‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री योगिता चव्हाण आता नव्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नव्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. ती अत्यंत साधी, प्रभावी अभिनयशैली ही तिची खास ओळख बनली आहे. प्रेक्षकांना तिची ही मालिका आणि तिचा अभिनय पसंतीस उतरला होता. आता या मालिकेनंतर योगिता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगिता चव्हाणची नवी मालिका ठराविक दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती पूर्णपणे वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. याआधी साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका अधिक मजबूत आणि नवे कथानक असणार आहे.
'तू अनोळखी तरी सोबती' ही नवी मालिका प्रेक्षकांना भेटीला येतेय. नव्या मालिकेच्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेध लावलं आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
कधी भेटीला येणार आहे मालिका?
येत्या ५ जानेवारीपासून रोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता व समीर या दोघांची ही कथा असून, नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील? नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे पाहणं रंजक असणार आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाण ही अर्पिता हे पात्र साकारणार आहे. योगिता म्हणाली, "या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक नवीन पात्र घेऊन प्रेक्षकांसमोर मी येत आहे. मनात थोडी धाकधूक, आनंद आहे. अर्पिता हे पात्र अगदीच साधं, सुशील, कुटुंबाचा विचार करणारी मुलगी आहे. ती एका चाळीत राहते. अर्पिता आणि योगिता मध्ये फरक आहे. अर्पिता कधीच स्वतःसाठी जगली नाही, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत राहणारी ती व्यक्ती आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यातही अशी एक व्यक्ती येईल तेव्हा खरंच मॅजिक होईल.
योगिता पुढे म्हणते- 'मी सुद्धा गेली २१ वर्ष ठाणे येथील किसननगर चाळीत राहिली आहे. त्यामुळे चाळीत शूटिंग करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. या मालिकेमुळे चाळीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय.'
अभिनेता अंबर गणपुले म्हणाला, "दोन अनोळखी व्यक्तींची ही कहाणी आहे. समीर हे पात्र खूप सौम्य, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारा आहे. कायम चेहऱ्यावर स्मित हास्य, नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक गोष्टी आत्मसात करणारा आहे. तो म्हणाला की, मी चाळीत कधी राहिलो नाही. पण ते जीवन मी लहानपणीच्या सुट्यांमध्ये अनुभवलं आहे. चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि आता समीरमुळे मला चाळीतलं जीवन जगायला मिळतंय?''