Viral Office Diwali Dance Video: दिवाळी म्हटलं की दिवे, मिठाई आणि आनंदाचा उत्सव आलाच. सणाच्या निमित्ताने अनेक कार्यालयांमध्येही दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते. कर्मचारी एकत्र येऊन गाणी, नृत्य आणि विविध कार्यक्रमांचा आनंद घेतात. मात्र, अशाच एका ऑफिसमधील दिवाळी पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हरियाणवी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तिच्या नृत्याचे काही जण कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
इन्स्टाग्रामवर अंशि मलिक (Anshii Malik) नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून ऑफिसच्या दिवाळी पार्टीत सहभागी झालेली दिसते. पार्टीमध्ये तिचे सहकारीही उपस्थित आहेत. काही जण मोबाईलमध्ये तिच्या डान्सचे व्हिडीओ शूट करताना दिसतात. सुरुवातीला ती सहकाऱ्यांसोबत पोझ देते. त्यानंतर 'तेरी आंख्या का यो काजल' या लोकप्रिय हरियाणवी गाण्यावर ती नाचते. गाण्याचे बोल सुरू होताच ती उत्साहात डान्स करू लागते. तिच्या डान्सला उपस्थित सहकारी टाळ्या वाजवून दाद देताना दिसतात.
'तेरी आंख्यां का यो काजल' हे गाणं हरियाणातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. डी.सी. मदाना यांनी हे गाणे गायले असून, वीर धैया यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. 'सूट तेरा पतला व्हॉल्यूम २' या अल्बममधील हे गाणे आहे. प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या डान्समुळे या गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली.
आजही लग्नसमारंभ, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे लावले जाते. भारताबाहेरही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली आहे. यापूर्वी अॅमस्टरडॅममध्ये किंग्स डेच्या सेलिब्रेशनदरम्यानही लोक या गाण्यावर थिरकताना दिसले होते.
दरम्यान, अंशि मलिकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिच्या डान्सवर टीका केली आहे. ऑफिससारख्या ठिकाणी अशा प्रकारचे नृत्य करणे योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. एका युजरने हा दिवाळी साजरा करण्याचा चुकीचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने ऑफिसमधील कार्यक्रमात अशा प्रकारच्या डान्सची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला.
काहींनी तर अशा डान्समुळे महिला सहकाऱ्यांबद्दल चुकीच्या चर्चा आणि टिप्पण्या होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली. मात्र, अनेकांनी या टीकेला विरोधही केला आहे. एका युजरने तरुणीच्या डान्समध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचे म्हटले.