अभिनेता जॉनी लिव्हर यांच्या अभिनयाचे फॅन खूप आहेत. अनेक सिनेमातील त्यांचे विनोद आणि त्याचे परफेक्ट टाइमिंगमुळे जॉनी आजवर अनेकांचा आवडता कलाकार बनला आहे. पण लहानपणापासून चढउतार पाहिलेल्या जॉनीने त्याच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा एका मुलाखती दरम्यान शेयर केला आहे. अभिनेत्री कुनिका सदानंद हीच्या पॉडकास्टवर हा किस्सा शेयर केला आहे.
जॉनी यामध्ये बोलताना म्हणतात, ‘माझ्या मुलाच्या कॅन्सरने आम्हाला सगळ्यांनाच दुखी केले होते. मुलाच्या गळ्याजवळ एक गाठ होती. ती गाठ कॅन्सरची असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. ऑपरेशनदिवशी डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावले. आणि त्याचा ट्यूमर दाखवला. तो अत्यंत अवघड ठिकाणी होता. डॉक्टरांनी हा ट्यूमर काढायची तयारी दर्शवली. पण त्यासोबत ही कल्पना दिली की हा ट्यूमर काढणे अत्यंत अवघड आहे. याशिवाय हा ट्यूमर काढून टाकण्याचे ऑपरेशन अयशस्वी झाले तर पॅरालिसिस, अंधत्व किंवा मेंदुवरील नियंत्रण कमी होणे हे प्रकार घडण्याची शक्यता असल्याचेही सांगितले.
यानंतर आम्ही ऑपरेशनचा प्लान कॅन्सल केला. मुलाचे जितके आयुष्य शिल्लक आहे तितके आनंदात घालवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. यासोबत मी आयुर्वेदिक ट्रीटमेंटही सुरू केली. माझा मुलगा 40-50 औषधे रोज खायचा. पण त्याने काहीच फरक पडला नाही. आणि ट्यूमर वाढतच गेला.
त्याचे लाड पुरवायचे म्हणून मी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला नेऊ लागलो. एकदा न्यू जर्सीच्या ट्रीपवर असताना आम्ही एका चर्चमध्ये गेलो होतो. त्यावेळी तिथे असलेल्या एका प्रिस्टने मला मुलाच्या ट्यूमरबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी एका हॉस्पिटलचे नाव सांगत तिथे जायला सांगितले. त्यावेळी तेथील डॉक्टर जतिन शाह यांची भेट घेतली.
तिथे मुलाचे ऑपरेशन करण्याचे ठरले. मी फार धार्मिक माणूस नाही पण त्याचे ऑपरेशन होईपर्यंत पूर्णवेळ मी प्रार्थना करत होतो. यानंतर मुलाचे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यावेळी मला किती आनंद झाला हे शब्दात सांगू शकत नाही. या घटनेने मी पूर्णपणे बदललो. त्यानंतर मी दारूसहीत इतर वाईट व्यसने सोडली.’