Why do actresses trust Orry so much? What makes him special? Urvashi Rautela gives a direct answer
पुढारी ऑनलाईन : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रामणी (ओरी) याची अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत घट्ट मैत्री आहे. पण अभिनेत्री त्याच्यावर इतक्या सहजपणे विश्वास का ठेवतात? याचे उत्तर अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने एका मुलाखतीत दिले आहे.
जाह्नवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, सुहाना खान यांसारख्या अनेक स्टार किड्ससोबत ओरीची चांगली मैत्री आहे. तो अनेकदा त्यांच्या सोबत विविध कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसून येतो. त्यामुळे ओरीमध्ये असे काय विशेष आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो.
उर्वशी रौतेला आणि ओरीची भेट कशी झाली?
उर्वशी रौतेलाने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिची आणि ओरीची ओळख दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान झाली होती. एका आफ्टर-पार्टीमध्ये ओरीने उर्वशीच्या ‘डाकू महाराज’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य केले होते.
उर्वशीच्या मते, ओरीने त्या गाण्याची कोरिओग्राफी अतिशय बारकाईने समजून घेतली होती आणि त्याने तिच्यापेक्षाही चांगला डान्स केला होता. या डान्सची रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.
अभिनेत्रींचा विश्वास जिंकण्यामागचे कारण
उर्वशीने सांगितले की, ओरीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तो कोणतीही गोष्ट गुप्त ठेवू शकतो. तो अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू मित्र आहे.
ती म्हणाली, “ओरी खूप प्रामाणिक आणि निष्ठावान मित्र आहे. त्याची ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. मी त्याच्यासोबत खूप सुरक्षित वाटते. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर मी त्याला एखादी गोष्ट सांगितली, तर तो ती कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगणार नाही. ती गोष्ट आमच्यातच राहते.” उर्वशीने पुढे असेही म्हटले की, “प्रत्येकाच्या आयुष्यात एक ओरी असायला हवा.”
उर्वशी रौतेलाचे आगामी चित्रपट
कामाच्या आघाडीवर पाहता, उर्वशी रौतेला 2025 मध्ये ‘डाकू महाराज’ या चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचा समावेश आहे.
हा ‘वेलकम’ फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट असून त्यात अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अरशद वारसी आणि सुनील शेट्टी यांसारखे अनेक मोठे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट 26 जून रोजी प्रदर्शित होणार असून, फ्रँचायझीच्या मागील चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.