पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' चा ट्रेलर बुधवारी (दि.8) प्रदर्शित झाला. 2024 सालातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या ट्रेलरमध्ये विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, राजपाल यादव यांच्या पात्रांची झलक पाहायला मिळते. 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये विद्या बालनचे 17 वर्षांनी पुनरागमन झाले आहे.
'भूल भुलैया 3' चा ट्रेलर जयपूरच्या राज मंदिर सिनेमात रिलीज झाला, जिथे विद्या बालन, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव, निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनीस उपस्थित होते. हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन रूह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी या चित्रपटात रूह बाबा एक नाही तर दोन मंजुलिकांचा सामना करणार आहे. विद्या बालन व्यतिरिक्त माधुरी दीक्षित देखील मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
या आधी चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर 266 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटात तब्बूने मंजुलिकाची भूमिका साकारली आणि तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालनचा हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया 3' यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. अनीस 'भूल भुलैया' (2007) चे दिग्दर्शकही होते. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' अजय देवगणच्या ॲक्शन-थ्रिलर 'सिंघम अगेन'शी टक्कर देणार आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा संघर्ष मानला जात आहे.