मुंबई - यशराज फिल्म्सच्या (YRF) स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित अॅक्शन थ्रिलर 'वॉर २' आता केवळ ३० दिवसांवर येऊन ठेपला आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यात हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांची झलक पाहायला मिळते. आता चित्रपटाला काहीच दिवस बाकी आहेत.
३० दिवसांच्या काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. कारण हा अॅक्शनपट येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदीसह तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'वॉर २' हा २०२५ मधील सर्वात मोठा सिनेमॅटिक अॅक्शन ठरण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. विशेष म्हणजे यामध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर एकत्र स्क्रीनवर येणार आहेत, तर कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'वॉर २' हा यशराज स्पाय युनिव्हर्समधील एक महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. याआधी 'पठाण' आणि 'टायगर' या सुपरहिट चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. आता वायआरएफच्या आणखी एका चित्रपटामुळे वॉर २ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हृतिकने एक्स अकाऊंटवर लिहिलंय- 'एकात कुठलीही दया नाही, दुसऱ्यात कुठलीही भीती नाही. त्यांच युद्ध-युद्ध जवळ आलं आहे. #30DaystoWar2. #War2 हिंदी, तेलुगु आणि तमिळमध्ये १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.
'वॉर २' हे सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनामध्ये 'वॉर'चे सीक्वल आहे, जो २०१९ मध्ये रिलीज झाला होता. 'वॉर'मध्ये हृतिक रोशन सोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर दिसले होते. दुसरीकडे 'वॉर २' मध्ये ऋतिक रोशनसोबत साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कियारा आडवाणी दिसणार आहेत. हा चित्रपट आदित्य चोप्रा बॅनर अंतर्गत बनवलं गेलं आहे.