Vijay Deverakonda-Rashmika Mandanna marriage:
नवी दिल्ली: दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारी 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रश्मिका आणि तिचा 'लव्ह ऑफ लाईफ' विजय देवरकोंडा यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानातील उदयपूर येथे पार पडत आहे. या शाही लग्नात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे रश्मिकाची धाकटी बहीण शिमन मंदाना.
दीदीच्या लग्नासाठी शिमन आपली आई सुमन मंदाना यांच्यासोबत उदयपूरमध्ये दाखल झाली आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या या 'रॉयल वेडिंग'मध्ये शिमन आपल्या लाडक्या 'जीजू'कडून शगुन घेण्यासाठी आणि 'जूता चुराई'च्या रस्मसाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे.
रश्मिका आणि शिमन यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रश्मिका आपल्या बहिणीला प्रसिद्धीच्या झोतातून नेहमीच दूर ठेवते. रश्मिका आणि शिमन यांच्या वयामध्ये तब्बल १६ वर्षांचे अंतर आहे. शिमन सध्या १४ वर्षांची असून ती दिसायला हुबेहूब रश्मिकासारखीच दिसते.
काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने आपल्या बहिणीबद्दल मनातील खंत व्यक्त केली होती. रश्मिका म्हणाली होती की, "माझ्या सुट्टीच्या दिवशी मी अनेकदा रडते, कारण मी माझ्या बहिणीसोबत वेळ घालवू शकत नाही. ती माझ्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. गेल्या ८ वर्षांत मी तिला मोठं होताना पाहू शकले नाही. आज ती माझ्या उंचीची झाली आहे, पण तिचा हा प्रवास अनुभवण्यापासून मी मुकले आहे."
रश्मिकाच्या पालकांनी जाणीवपूर्वक शिमनला ग्लॅमरच्या जगापासून दूर ठेवले आहे. रश्मिकाच्या लोकप्रियतेचा परिणाम तिच्या लहानपणावर होऊ नये आणि तिचे संगोपन एका सामान्य वातावरणात व्हावे, अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. शिमनने एक उत्तम व्यक्ती म्हणून घडावे, यासाठी तिला प्रसिद्धीपासून लांब ठेवण्यात आले आहे.