अभिनेते सौरभ राज जैनने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे Sourabh raaj Jain Instagram
मनोरंजन

Veer Murarbaji|'वीर मुरारबाजी' चित्रपटासाठी प्रतीक्षा; यादिवशी रुपेरी पडद्यावर

अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ ला ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ मालिका तसेच 'ओम नमो व्यंकटेशाय' या दाक्षिणात्य चित्रपटात 'तिरुपती बालाजी' यांची भूमिका अभिनेता सौरभ राज जैन याने साकारली होती. आता आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याने साकारली आहे. त्याचे विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए. ए. फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यच समजतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं हेच प्रेम मिळेल, अशी आशा आहे.
अभिनेता सौरभ राज जैन

निर्माते अजय आरेकर काय म्हणाले?

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहोचवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT