रविवारी कोटा येथे एक आगीचा भयानक प्रकार घडला. ज्यामध्ये 2 लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला. सिरियल वीर हनुमानमधील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. वीर 10 वर्षांचा होता. (Latest Entertainment News)
प्राथमिक अहवालानुसार समोर येत आहे की चौथ्या मजल्यावर असलेल्या शर्मा कुटुंबाच्या ड्रॉइंग रूममध्ये आग लागली. आग आणि धूर वेगाने सगळ्या घरभर पसरले. हे दोन भाऊ ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीतही धूर प्रचंड प्रमाणात साठला. काही मदत पोहोचण्यापूर्वीच या दोन्ही भावांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीची घटना घडली तेव्हा या दोन्ही मुलांचे पालक घरी नव्हते. वीरचे वडील एका भजन कार्यक्रमात भाग घ्यायला गेले होते. तर त्याची आई रिता शर्मा त्यावेळी मुंबईमध्ये होती.
शेजाऱ्यांनी घरातून धूर आलेले पाहिले. त्यांनी जबरदस्ती दरवाजा तोडला. दोन्ही मुलांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले. पण दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
घरात लागलेल्या या आगीचे कारण शॉर्टसर्किट सांगितले जात आहे. ड्रॉइंगरूम पूर्णपणे जळून खाक झाली होती.
आई रिता मुंबईहून आल्यानंतर मुलांचे मृतदेह त्यांच्या पालकांना सोपवले गेले. पालकांच्या इच्छेनुसार दोन्ही मुलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. दुखाचा डोंगर कोसळलेला असतानही रिताने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
दहा वर्षांच्या वीरने कमी वयात अभिनयाची सुरुवात केली. वीर हनुमान मालिकेत त्यानी बाल लक्ष्मणची भूमिका केली होती. याशिवाय एका सिनेमात त्याने सैफ अली खानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.