Upcoming Marathi Movies list
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोगांची, दमदार कथानकांची आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची रेलचेल सुरू आहे. प्रेक्षकांसाठी एकापेक्षा एक सरस असे अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. रोमँटिक, थ्रिलर, सामाजिक ते ऐतिहासिक अशा विविध विषयांवर आधारित हे चित्रपट येताहेत. आगामी चित्रपटाचे कथानक, विषय, कलाकार सर्वच काही सरस आहेत.
टीझर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला ‘मना’चे श्लोक’ चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेने केले आहे. निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार दिसणार आहेत. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील. दरम्यान, 'मना'चे श्लोक'मधून लीना भागवत - मंगेश कदम मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटात श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी जोडी झळकणार आहे. प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं लोकप्रिय झालं होतं. अभिनेता श्रमेश बेटकर, जुईलीसह निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे दिसणार आहेत.
छायांकन हरेश सावंत यांचं आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते, सचिन कदम, अमृता जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे.कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे. असून येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात स्मिता शेवाळेची सुंदर भूमिका आहे. पटकथा, लेखन, दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.
या चित्रपटात स्मिता शेवाळेने आवली ही भूमिका साकारली आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’सारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ मधून वारकरी परंपरेतील एका दुर्लक्षित स्त्रीपात्राला नव्या दृष्टीने मांडणार आहेत.
मराठी पडद्यावर थ्रिलर, कॅामेडी रावण कॉलिंगची भेटीला येणार आहे. हा टित्रपट नव्या वर्षात ९ जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गोल्डन गेट प्रॅाडक्शन निर्मित आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. यात सचित पाटील, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, गौरव घाटणेकर, रवी काळे आणि मिलिंद गुणाजी अशी दिग्गज कलाकारांची मोठी फौज झळकणार आहे.
‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटात हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांचे आहे. फाईन ब्रू प्रॉडक्शन्स प्रस्तुत व ट्रू होप फिल्म वर्क्स यांच्या सहयोगाने चित्रपट भेटीला येतोय. जयकुमार मुनोत, ईशा मूठे व श्रुती साठे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.