Upcoming Marathi Movies 2025 Instagram
मनोरंजन

Upcoming Marathi Movies 2025 | नव्या चित्रपटांची मांदियाळी! नवे कोरे 'हे' मराठी सिनेमे येताहेत तुमच्या भेटीला

Upcoming Marathi Movies 2025 | नव्या वर्षांत आगामी मराठी चित्रपट नवे आशय घेऊन भेटीला येताहेत. तुम्ही कोणते सिनेमे पाहणार?

स्वालिया न. शिकलगार

Upcoming Marathi Movies Will Release in 2025

मुंबई :

नव्या वर्षात २०२५ मध्ये अनेक नवे विषय आणि आशय घेऊन मराठी चित्रपट येत आहेत. मे आणि जूनमध्ये प्रदर्शित होणारे काही आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या. अनेक गंभीर विषयांपासून ते ॲक्शन चित्रपटांची कथा घेऊन हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. आगामी चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार आणि ते कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार, याविषयी जाणून घेऊयात.

‘वामा – लढाई सन्मानाची’

स्त्रीशक्तीचे प्रखर आणि प्रभावी दर्शन घडवणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा स्त्री-प्रधान चित्रपट असल्याचे कळतेय. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी झळकत असून तिच्या नजरेतील तीव्र क्रोध आणि आत्मविश्वासू लूकने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात," ‘वामा’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा विषय खूप महत्त्वपूर्ण असून तो आजच्या स्त्रियांसाठी गरजेचा आहे.

चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात," ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट फक्त एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नाही, तर समाजाच्या मानसिकतेविरुद्ध चाललेली ही एक जोरदार लढाई आहे. "

शातिर The Beginning

करायला अट्टल गुन्हेगारांची "खातीर"... घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर...!!! अशा हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर 'शांतिर The Beginning ' आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते. हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शातिर The Beginning या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शातिर The Beginning च्या टीजर वरून दिसते की हा आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट असून कॉलेज तरुणाई मध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनांवर भाष्य करणारा असल्याचे दिसतो. पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला ड्रग्ज माफिया कोण ? दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शांतिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणून पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरवर, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, अॅड. रामेश्वर गिते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका शातिरमध्ये आहेत.

आतली बातमी फुटली

वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकार दिसणार आहेत.

'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत.

अमायरा

सुभाष घाई यांच्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे. अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत हे मराठी सिनेश्रुष्टीतील उत्तम कलाकार असून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सई सचिन गोडबोले असणार आहे. हा चित्रपट येत्या १६ मे २०२५ ला प्रदर्शित होईल.

सुभाष घाई म्हणाले, "मुक्ता आर्टस्चा नवा मराठी सिनेमा अमायरा खूप चांगला बनवला गेला आहे, छान म्युजिक आहे, सर्वानी छान ॲक्टिंग केलंय. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कलेचा फॅन आहे. महाराष्ट्रने मला सुरुवातीपासून खूप काय दिलं आहे त्यामुळे माझं हे कर्तव्य होतं की, मी त्याची परतफेड करू."

दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे असून लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तर सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल आहेत. या सिनेमाला संगीत रोहित राऊतने दिलं आहे.

क्रांतीज्योति विद्यालय

‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा असणार आहे तर आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॅाडक्शन सोबत त्यांचा सलग तिसरा चित्रपट असणार आहे.

मराठी शाळांमधील शिक्षणपद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट मनोरंजन करताना विचार करायला लावणारा ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या माध्यमातून होणाऱ्या जडणघडणीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT