tusshar kapoor allegedly received call from someone claiming to be harry boxer member of lawrence bishnoi gang
पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर याला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. कथितरित्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीने तुषार कपूरला फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रेटीजना धमक्यांचे आणि खंडण्यांचे फोन येण्याच्या घटना वाढल्याने सध्या बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अभिनेत्याकडे खंडणीची मागणी
वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरला कथितरित्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. या व्यक्तीने अभिनेत्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते.
तुषार कपूरने याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अँटी-एक्स्टॉर्शन सेल आणि क्राइम ब्रँचकडे सोपवला आहे.
क्राइम ब्रँचच्या तपासात काय समोर आले?
क्राइम ब्रँचच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग तपासले. तसेच, पोलिसांच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या हॅरी बॉक्सरच्या अधिकृत आवाजाच्या नमुन्याशी या रेकॉर्डिंगमधील आवाजाची तुलना केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही आवाजांचे नमुने जुळले नाहीत. त्यामुळे हा फोन बनावट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणीतरी बिश्नोई टोळीच्या नावाचा वापर केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी हे ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.