Trisha's Karuppu Cancellation: अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा करूप्पू तमिळनाडूमध्ये रिलीज होणार होता. मात्र त्याच्या रिलीजवर संकट कोसळलं असून या चित्रपटाचे एका पाठोपाठ एक शो हे कॅन्सल होत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचा सकाळचा शो कॅन्सल झाला होता. आता चेन्नईतील थेएटर्सनी सायंकाळचा आणि रात्रीचा शो देखील रद्द केला आहे.
चेन्नईतील EGA सिनेमाने ट्विट केलं की, 'निर्मात्याच्या काही आर्थिक कारणांमुळे दुपारी १२.३० चा चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात येत आहे. रिफंड परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी तिकीट काढले आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर शो कॅन्सल झाल्याचे मेसेज पाठवण्यात येत आहेत. तसदीबद्दल खेद आहे.'
आरजे बालाजी यांनी निर्देशित केलेला हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र निर्माता आणि गुंतवणूकदार यांच्यातील काही आर्थिक व्यवहार अपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चित्रपट प्रदर्शन पुढं ढकललं आहे.
मात्र असं असलं तरी याबाबत अधिकृत माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही. चित्रपट का रिलीज होत नाहीये आणि तो कधी रिलीज होणार याबाबत थिएटर आणि प्रेक्षकांना अजूनही स्पष्टता मिळालेली नाही.
वेट्टरी थिएटर्स, कमला सिनेमा, जीके सिनेमा, इजीए सिनेमा या प्रमुख थिएटर चेन्सने प्रेक्षकांना ट्विटर हँडलवरून संध्याकाळचे शो कॅन्सल झाल्याची आणि रिफंड देत असल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी चित्रपटाच्या सकाळी ९ वाजताच्या शो ला विशेष परवानगी दिल्यानंतरही चित्रपटाचे शो रद्द केले जात आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून चाहत्यांनी या चित्रपटाचे सकाळच्या शो ची तिकिटे बूक करताना अडचणी येत आहेत अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत होते.
दरम्यान, दिग्दर्शक आरजे बालाजी यांनी एक्सवर ट्विट केलं की, 'प्रिय चाहत्यांनो सध्याच्या परिस्थितीचे माझ्याकडे ठोस असे कारण नाही. निर्माते ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट नेहमीच अडचणीत येत राहिला आहे. मात्र परमेश्वराने या सर्वातून मार्ग काढून दिला. ३२ महिन्यानंतर आता आम्ही रिलीजसाठी सज्ज होतो. यावेळी देखील परमेश्वर मार्ग काढेल माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.'