Dharmendra Political Controversy Parliament Roof Statement Bikaner Elections:
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली असून संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. IANS च्या माहितीनुसार, 89 वर्षीय धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी दीर्घ आजारानंतर निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांना अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 12 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र त्यानंतर स्थिती पुन्हा गंभीर झाली आणि शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या आयुष्यात लोकांना भावणाऱ्या अनेक घटना आहेत. त्यापैकी एक घटना त्यांच्या राजकीय प्रवासाशी निगडित आहे, जी आज त्यांच्या जाण्यानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत एक प्रसंग असा घडला की भारतीय राजकारणात क्षणभर ‘शोले’ची झलकच दिसली. निवडणूक प्रचारादरम्यान धर्मेंद्र यांनी जोशात एक विधान केलं होतं “सरकारने माझं ऐकलं नाही तर मी संसदच्या छतावरून उडी मारेन!”
हे विधान जणू त्यांच्या सिनेमातील डायलॉगसारखेच वाटत होते. धर्मेंद्र यांचा हा फिल्मी इशारा निवडणूक प्रचारात खूपचं गाजला होता. विशाल बहुमताने विजय मिळवून ते संसदेत पोहोचले, पण काही वर्षांतच राजकारणाबद्दल त्यांचा मोहभंग झाला.
धर्मेंद्र 2004 मध्ये भाजपाच्या शायनिंग इंडिया मोहिमेने प्रभावित होऊन राजकारणात आले. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबत लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
भाजपाने त्यांना राजस्थानच्या बीकानेर मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश्वरलाल डूडी यांना तब्बल 60 हजार मतांनी पराभूत केले.
निवडून आल्यावर परिस्थिती बदलली. हळूहळू त्यांच्यावर आरोप होऊ लागले की ते बीकानेरच्या मतदारांमध्ये फारसे जात नाहीत, संसदेतही त्यांची उपस्थिती कमी असते आणि ते बराच वेळ शूटिंग किंवा फॉर्महाऊसवर व्यतीत करतात. काही लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ सांगितले की ते प्रत्यक्ष समोर नसले तरी ते काम करून घेत आहेत. तरीही त्यांच्यावर “निष्क्रिय खासदार” असा शिक्का बसला.
2009 मध्ये त्यांचा कार्यकाल संपताच धर्मेंद्र यांनी राजकारणातून पूर्णपणे माघार घेतली. त्यांनी पुन्हा कधीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते “काम मी करत होतो, क्रेडिट दुसरेच घेत होते… कदाचित हे जग माझ्यासाठी नव्हते.” त्यांचा मुलगा सनी देओल यांनीही सांगितले होते की वडिलांना राजकारण अजिबात आवडले नाही आणि निवडणूक लढवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता.
धर्मेंद्र यांच्या जगण्यातील आणि व्यक्तिमत्त्वातील हा राजकीय अध्याय आज त्यांच्या निधनानंतर पुन्हा आठवला जात आहे. एकेकाळी पडद्यावर उभा राहून लोकांना वेड लावणारा हा “ही-मॅन” वास्तवात मात्र राजकारणाच्या चौकटीत बसला नाही. त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर एक युग हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.