the Bengal files trailer launched
मुंबई - विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी हिंदी भाषेतील चित्रपट 'द बंगाल फाईल्स'चा ट्रेलर अखेर रिलीज केला. हा ट्रेलर यु-ट्यूबवर पाहता येईल. शनिवारी, १६ ऑगस्ट, २०२५ रोजी कोलकाता येथे ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात गदारोळ उडाला. विवेक अग्निहोत्री यांनी आधीच निर्णय घेतला होता की, ते आपल्या 'द बंगाल फाईल्स' चित्रपटाचा ट्रेलर कोलकातामध्ये लॉन्च करतील. त्यांना हा ट्रेलर लॉन्च सोहळा एका चित्रपटगृहात लॉन्च करायचा होता. परंतु, कोलकाता पोहोचल्यानंतर त्यांना समजलं की, ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द करण्यात आला आहे. यानंतर विवेक यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी एका खासगी हॉटलमध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. याठिकाणीही चित्रपट 'द बंगाल फाईल्स'च्या ट्रेलर विरोधात कार्यक्रमामध्ये गदारोळ झाला, त्यानंतर विवेक यांना ते ठिकाण सोडून जावं लागलं. या प्रकारानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, पश्चिम बंगाल सरकार मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, अनेक अडचणींनंतर अखेर 'द बंगाल फाईल्स'चा ट्रेलर समोर आला आहे.
विवेक अग्निहोत्रीने पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, त्यांचा चित्रपट इतका गदारोळ घालण्यासारखा नाही, ज्यासाठी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अडचणी आणल्या गेल्या. कार्यक्रमात विवेक अग्निहोत्रीसोबत त्यांची पत्नी, अभिनेत्री पल्लवी जोशी देखील उपस्थित होती. याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना बोलवावं लागलं.
यानंतर पल्लवी जोशीने दावा केला की, 'ज्याप्रकारे चित्रपट थांबवण्यात आला आहे, हे मला अजिबात आवडलेले नाही. या शहरात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. आम्ही एक निर्माते आणि अभिनेते म्हणून आम्ही जे बनवलं आहे, ते आम्हाला दाखवू दिलं नाही. त्यांना कोणत्या गोष्टीचे भय आहे? असे काही काश्मीरमध्ये झाले नव्हते. काय आम्ही असा विचार करू की, काश्मीरमध्ये बंगालपेक्षा चांगली परिस्थिती आहे? पाहा आज बंगालमध्ये काय होत आहे. आणि यासाठी द बंगाल फाईल्स सारखा चित्रपट गरजेचा आहे. मैला वाटते की, भारताचा प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहावा आणि बंगालचे सत्य जाणून घ्यावे. ही राज्याची जबाबदारी आहे की कलाकारांना सन्मान मिळावा.'