Tere Ishk Mein Box Office Collection Day 2: धनुष आणि कृति सेनन यांच्या ‘तेरे इश्क में’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत दुसऱ्याच दिवशी इतिहास रचला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शित होताच 2025 मधील टॉप ओपनर्समध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या या कमाईच्या रेकॉर्डने आता 10 वर्षांपूर्वीचा धनुषचाच रेकॉर्ड मोडला आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 16 कोटींची ओपनिंग केल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजेपर्यंत आणखी 4.35 कोटींची भर घालत दोन दिवसांची एकूण कमाई 20.35 कोटी केली आहे. सॅक्निल्कने दिलेली ही प्राथमिक आकडेवारी असून दिवस अखेरीस ही कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आश्चर्य म्हणजे ‘तेरे इश्क में’ने फक्त दोन दिवसांतच धनुषच्या ‘शमिताभ’ (2015) या चित्रपटाच्या 22.27 कोटींच्या लाइफटाइम कलेक्शनची बरोबरी केली आहे. ‘शमिताभ’ने जेवढं कमवलं, तेवढं ‘तेरे इश्क में’ने दोन दिवसांत कमवत जुना रेकॉर्ड मोडला आहे.
चित्रपटाची क्रेझ पाहता, आता धनुषच्या ‘रांझणा’ (2013) च्या 60.22 कोटींच्या लाइफटाइम कलेक्शनला ओलांडण्याची वेळ आली आहे. सध्याचा ट्रेंड आणि विकेंडची वाढती कमाई पाहता हा टप्पा पार करणे कठीण वाटत नाही.
चित्रपटाचे एकूण बजेट अंदाजे 85 कोटी आहे. कोणत्याही चित्रपटाला हिट ठरायचे असेल तर स्वतःच्या बजेटच्या किमान दुप्पट म्हणजेच 170 कोटी कमाई करावी लागते. ‘तेरे इश्क में’ची सुरूवात पाहता हा आकडा गाठण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे.
पहिल्याच दिवशी चित्रपटाने वर्ल्डवाइड 22 कोटींचा व्यवसाय करीत धनुषची पॅन-इंडिया लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात धनुष आणि कृति सेननची जोडी प्रेक्षकांना खूप भावत आहे.