‘अग्गंबाई सासूबाई’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. आता निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री प्रधानची झलक समोर आल्याने चाहत्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. सोशल मीडियावर या दोघींच्या पुनर्भेटीची जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
मराठी मालिकाविश्वात काही जोड्या अशा असतात की त्या वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. अशाच लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत सासू-सुनेची अनोखी आणि हळवी केमिस्ट्री साकारत या दोघींनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही या मालिकेची आठवण अनेक चाहते आवर्जून काढतात.
दरम्यान, निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा या जोडीची चर्चा रंगू लागली आहे. झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून त्यांच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेमध्ये निवेदिता सराफ यांनी तेजश्री प्रधानच्या सासूबाईंची भूमिका साकारली होती. या दरम्यान पडद्यावर सासू-सुनेची भूमिका साकारताना दोघींमध्ये असलेला जिव्हाळा आजही तितकाच घट्ट आहे. आता दोघींची नवी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’येतेय. या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून निवेदिता पुनरागमन करत आहेत.
तेजश्रीने ‘वीण दोघातली हे तुटेना’ मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारली होती. तेजश्री प्रधान नुकतीच ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या प्रमोशनल शूटसाठी सेटवर पोहोचली. कृष्णाई आणि तिच्या लेकींसोबत खानावळीच्या सेटवर शूट करताना ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
तेजश्री म्हणाली, “निवेदिता ताईंना भेटण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. ‘कृष्णाईच्या लेकी’ सेटवर क्रॉस प्रमोशनसाठी गेले होते. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या दिवसांच्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पहिल्या प्रोमो शूटच्या दिवशीच आमचं इतकं छान जुळून आलं होत आणि इतक्या गप्पा आम्ही मारत होतो कि डॉ. गिरीश ओक म्हणाले की, ‘संपूर्ण मालिकेसाठी थोड्या गप्पा राखून ठेवा’. आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. कृष्णाईच्या तिन्हीही लेकी खूप छान आहेत. निवेदिता ताई आणि मी पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. खानावळीचा सेट अप्रतिम तयार करण्यात आला आहे.”
निवेदिता सराफ यांच्याबद्दलचा बोलताना तेजश्री म्हणाली, “मला निवेदिता ताई खूप आवडतात. त्या अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांची आणखी एक सुंदर सवय म्हणजे तुम्ही खायची एखादी आवडीची गोष्ट सहज बोलून जाता आणि विसरूनही जाता. पण त्या ते लक्षात ठेवतात. दोन-तीन दिवसांनी स्वतः ती गोष्ट बनवून घेऊन येतात आणि म्हणतात, ‘तुला हे खायचं होतं ना!’ त्या माझ्यासाठी इतक्या जवळच्या आहेत की मला मासे खायची इच्छा झाली तर मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकते.”