तस्लिमा नसरीन यांनी केली 'एक्स' पोस्ट
रहमान यांच्या विधानावर केले सवाल
खऱ्या अडचणी माझ्यासारख्या लोकांना येत असल्याचाही केला दावा
Taslima Nasreen on AR Rahman religious comment
नवी दिल्ली: ऑस्कर-विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील कथित 'धार्मिक' भेदभावाबाबत केलेल्या त्यांच्या टिप्पणीवरून निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे ए. आर. रहमान यांनी याप्रकरणावर स्पष्टीकरण देवून पडदा टाकल्यानंतर नसरीन यांनी त्यांच्या विधानावर भाष्य केले आहे.
नुकत्याच 'बीबीसी एशियन नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळण्याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, "सध्या अशा लोकांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आहे जे स्वतः सर्जनशील नाहीत. कदाचित यात धार्मिक भेदभावाचा पैलू असू शकतो, पण तो माझ्या समोर कधी आला नाही. या गोष्टी माझ्यापर्यंत लोकांकडून ऐकीव माहितीच्या स्वरूपात पोहोचतात. काम कमी झाल्याने मला आराम मिळतो आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो, ही चांगलीच गोष्ट आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली होती. मात्र यावर चौफेर टीका झाली. यानंतर रविवारी (दि. १८) कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कधीच प्रयत्न नव्हता, असे स्पष्ट करत रहमान यांनी वादावर पडदा टाकला होता.
तस्लिमा नसरीन यांनी 'एक्स' पोस्ट करत रहमान यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ए. आर. रहमान हे मुस्लिम आहेत आणि भारतात प्रचंड प्रसिद्ध आहेत. माझ्या ऐकिवात आहे की, त्यांचे मानधन इतर कोणत्याही कलाकारापेक्षा जास्त आहे. ते कदाचित सर्वात श्रीमंत संगीतकार आहेत. असे असताना, मुस्लिम असल्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही, अशी तक्रार ते करत आहेत."
शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची उदाहरणे देत म्हटले की, "प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींना कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही; मग त्यांचा धर्म किंवा जात कोणतीही असो. रहमान यांचा सर्वधर्मीय लोक आदर करतात, त्यामुळे त्यांनी स्वतःबद्दल सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे त्यांना शोभत नाही."
स्वतःचा उल्लेख करत नसरीन म्हणाल्या की, खऱ्या अडचणी माझ्यासारख्या लोकांना येतात. "मी नास्तिक असूनही केवळ नावामुळे मला मुस्लिम समजले जाते. मुस्लिमविरोधी लोकांना मी नास्तिक आहे की श्रद्धाळू याने फरक पडत नाही. मला कोणी घर भाड्याने देत नाही, रुग्णालयात माझी फसवणूक होते, हैदराबादमध्ये मला मारहाण झाली आणि पश्चिम बंगालमधून मला बाहेर काढले गेले. खऱ्या अडचणी अशा असतात," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.