Tanushree Dutta on Nana Patekar Pudhari
मनोरंजन

Tanushree Dutta: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून तनुश्री दत्ता काय म्हणाली? समोर आला व्हिडीओ; 'सध्या माझं...'

Tanushree Dutta on Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली.

Rahul Shelke

Tanushree Dutta on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्तानेही सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. तनुश्रीने नानांचे थेट नाव घेतले नाही. मात्र, एका व्हिडीओमध्ये तिने त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्याचे सांगितले आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

तनुश्री दत्ताने नेमकं काय म्हटलं?

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी सकाळी समोर आली. त्यानंतर तनुश्री दत्ता इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे दिसून आले. तिने सुरुवातीला देवी दुर्गेची प्रार्थना असलेली पोस्ट शेअर केली. त्यानंतर तिने विमानतळावर फिरतानाचे आणि ब्रंच करतानाचे काही व्हिडीओही पोस्ट केले.

यानंतर तनुश्रीने एका व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. ती म्हणाली, “मला ही बातमी ऐकायला मिळाली आहे. पण आज माझ्यासाठी कामाचा दिवस आहे. मी एका कार्यक्रमासाठी लखनऊला जात आहे आणि मला सध्या त्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे.”

पुढे ती म्हणाली की, लखनऊमध्ये तिचा एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तिच्या संपूर्ण दिवसाचे नियोजन आधीच करण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे हा दिवस विचित्र वाटत असल्याचेही तिने सांगितले.

तनुश्रीने पुढे म्हटलं, “आज संध्याकाळी माध्यमांना कदाचित याच बातमीत रस असेल, अशी मला चिंता आहे. मी माझी प्रतिक्रिया नंतर देईन. मला आधी माझी प्रतिक्रिया काय असावी, हे ठरवायचं आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती नक्कीच माझ्या संवेदना आहेत, पण...”

इतक्यात तिचा व्हिडीओ संपला. तनुश्रीने या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांचे नाव घेतले नाही. त्यानंतर तिने लखनऊला जाण्यासाठी विमानात बसतानाचे काही व्हिडीओही शेअर केले.

२०१८ मध्ये तनुश्रीने केले होते गंभीर आरोप

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद २०१८ मध्ये चर्चेत आला होता. ‘मी टू’ मोहिमेदरम्यान तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

हा प्रकार २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडल्याचा दावा तनुश्रीने केला होता. तिच्या आरोपांनंतर भारतात ‘मी टू’ चळवळीला मोठ्या प्रमाणात वेग आला. त्यानंतर अनेक महिलांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचे अनुभव आल्याचे सांगितले.

तनुश्रीने २००८ मध्येच या प्रकरणी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे (CINTAA) तक्रार केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी या तक्रारीवर कारवाई झाली नसल्याचे तिने म्हटले होते.

नाना पाटेकरांनी आरोप फेटाळले होते

तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणी नानांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

२०१९ मध्ये पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत हे प्रकरण बंद करण्यात आले. त्यानंतर २०२५ मध्ये मुंबईतील अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयानेही या प्रकरणातील फौजदारी कार्यवाही पुढे नेण्यास नकार दिला. तक्रार दाखल करण्यास कायद्यातील ठरवून दिलेल्या कालमर्यादेपेक्षा उशीर झाल्याचे न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आले.

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, तिने अद्याप नानांच्या निधनावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT